बंगळुरु : वृत्तसंस्था
सर्फराज खान आणि ऋषभ पंत यांनी धडाकेबाज फटकेबाजी केल्याने भारताला या सामन्यात दमदार कमबॅक करता आले. या दोघांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजीची जोरदार धुलाई केली. त्यामुळे भारताला आघाडी मिळवता आली आणि त्यांना न्यूझीलंडला दमदार टार्गेटही देता आले. खेळपट्टी पाहता भारतीय संघाला विजयाची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता भारतीय संघ विजयासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी १० विकेट्स काढाव्या लागतील तर न्यूझीलंडला जिंकण्यासाठी १०७ धावांचे टार्गेट देण्यात आले आहे.
सर्फराज खान आणि ऋषभ पंत चौथ्या दिवसाची भन्नाट सुरुवात केली. सर्फराज खानने तर यावेळी गोलंदाजांविरुद्ध चांगलीच आघाडी उभारली होती. तिस-या दिवशी सर्फराज खान हा ७० धावांवर खेळत होता. पण चौथ्या दिवशी सकाळी फलंदाजीला आल्यावर त्याने आक्रमक पवित्रा घेत शतक झळकावले. सर्फराजने हवेत उडी मारत जोरदार सेलिब्रेशन केले. त्यानंतरही जोरदार फटकेबाजी केली. त्याला यावेळी चांगली साथ मिळाली ती पंतची. कारण पंतनेही दमदार फलंदाजी करायला सुरुवात केली. त्यानंतर सर्फराजने दीड शतक पूर्ण केले. त्यानंतर तो झेल बाद झाला. त्याने १८ चौकार आणि तीन षटाकारांच्या जोरावर १५० धावांची खेळी साकारली. त्यानंतर पंतने फटकेबाजी केली. परंतु तो ९९ धावांवर खेळत असताना एक चेंडू थोडीशी उसळी घेऊन त्याच्याजवळ आला आणि स्टम्पवर जाऊन आदळल्याने तोही बाद झाला.