32.5 C
Latur
Monday, April 7, 2025
Homeअंतरराष्ट्रीयभारत-पाकसह १४ देशांवर सौदी अरेबियाची व्हिसा बंदी

भारत-पाकसह १४ देशांवर सौदी अरेबियाची व्हिसा बंदी

रियाध : वृत्तसंस्था
सौदी अरेबियाने भारतासह १४ देशांना व्हिसा देण्यावर तात्पुरती बंदी घातली आहे. भारतासह १४ देशांच्या यादीमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशचाही समावेश आहे. सौदीमध्ये काही परदेशी नागरिक नोंदणीशिवाय हज करत होते. अशा लोकांना रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. २०२४ मध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर सौदी क्राउन प्रिन्सने अधिका-यांना व्हिसाचे नियम कडक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानंतर हजमध्ये होणारी अनावश्यक गर्दी रोखण्यासाठी आणि यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी सौदीने ही घोषणा केली आहे.

हज यात्रेदरम्यान, सौदी अरेबियामध्ये गेल्यावर्षी १,००० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. हजयात्रेदरम्यान प्रचंड गर्दी झाली होती आणि त्याचा तिथल्या व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण पडला. यादरम्यान, उष्माघाताने अनेकांना जीव गमवावा लागला. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये नोंदणीशिवाय हज यात्रेत सहभागी झालेल्या लोकांचा समावेश होता.

सौदी अरेबियाने १४ देशांच्या नागरिकांना कुटुंब, प्रवास आणि उमराह या तीनही प्रकारचे व्हिसा देण्यावर तात्पुरती बंदी घातली आहे. ही बंदी जूनच्या मध्यापर्यंत लागू राहणार आहे. याच दरम्यान यंदाची हज यात्राही संपणार आहे. भारताव्यतिरिक्त ज्या देशांवर ही बंदी घालण्यात आली आहे, त्यात पाकिस्तान, बांगलादेश, इजिप्त, इंडोनेशिया, इराक, नायजेरिया, जॉर्डन, अल्जेरिया, सुदान, इथिओपिया, ट्युनिशिया आणि येमेन या देशांचा समावेश आहे. तसेच सौदी अरेबियात येणारे परदेशी नागरिक १३ एप्रिलपर्यंतच उमराह व्हिसासाठी अर्ज करू शकतात.

१३ एप्रिलनंतर हज यात्रा संपेपर्यंत कोणताही नवीन उमराह व्हिसा जारी केला जाणार नाही, असेही सांगण्यात आले आहे. हजदरम्यान बेकायदेशीरपणे राहणा-या कोणत्याही व्यक्तीला सौदी अरेबियात प्रवेश केल्यास ५ वर्षांसाठी बंदी घालण्यात येईल, असा कडक इशारा सौदी प्रशासनाने दिला आहे. याशिवाय १०,००० सौदी रियाध म्हणजेच २ लाख २८ हजार रुपये इतका दंडही ठोठावण्यात येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR