22.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeपरभणी‘माझा लहान भाऊ’ म्हणत मोदींनी जानकर यांना भर मंचावर शिट्टी दिली

‘माझा लहान भाऊ’ म्हणत मोदींनी जानकर यांना भर मंचावर शिट्टी दिली

परभणी – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज महाराष्ट्रात दोन सभा झाल्या असून नांदेडमधील सभेनंतर मोदींनी परभणीतील सभा गाजवली. महायुतीचे उमेदवार आणि रासपचे प्रमुख महादेव जानकर यांच्या उमेदवारीसाठी मोदींनी परभणीत सभा घेत काँग्रेसवर निशाणा साधला. इंडिया आघाडीवर हल्लाबोल करताना, मोदींनी राज्यातील महायुती सरकार हे विकासाची कास धरून राज्याचा विकास करत असल्याचे म्हटले. परभणीतील सभेत मोदींनी महादेव जानकर यांचा लहान भाऊ म्हणून उल्लेख केला. माझा लहान भाऊ महादेव जानकर, त्यांना संसदेत पाठवा, असे म्हणत मोदींनी भर मंचावर जानकरांना शिट्टी दिली. त्यावेळी, आनंदाच्या भरात जानकरांनीही जोरजोराने शिट्टी वाजवली.

परभणी लोकसभेसाठी २६ एप्रिल रोजी मतदान होत असून महादेव जानकरांना शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय (बंडू) जाधव यांचे आव्हान आहे. मात्र, परभणीचे गत २०१९ चे राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर हेही यंदा महादेव जानकरांसोबत आहेत. महायुतीतली राष्ट्रवादी काँग्रेसने येथील आपली जागा महादेव जानकर यांच्यासाठी सोडल्याने राजेश विटेकर हेही जानकरांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. त्यातच, आज नरेंद्र मोदींची सभा झाल्याने महायुतीच्या उमेदवारासह सर्वांचा उत्साह वाढला आहे.

येत्या २६ एप्रिल रोजी परभणीसाठी मतदान होत आहे, त्यावेळी परभणीकरांनी महायुतीचे उमेदवार आणि माझे लहान भाऊ महादेव जानकर यांना निवडून द्या, असे आवाहन मोदींनी केले. मोदींनी लहान भाऊ म्हणताच महादेव जानकर यांनी आपल्या जागेवरून उठून हात जोडून सर्वांना अभिवादन केले. यावेळी, त्यांच्या चेह-यावरील आनंद स्पष्ट दिसत होता. विशेष म्हणजे, मोदींनी मंचावरच महादेव जानकरांच्या हातात, त्यांचे उमेदवारी चिन्ह असलेली शिट्टी दिली. तर, जानकरांनीही ती शिट्टी जोरजोरात वाजवून दाखवली. माझा लहान भाऊ विजयी होण्यासाठी, तुम्ही घरोघरी जाऊन मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी लोकांना मार्गदर्शन करावे, पोलिंग बुथवर जाऊन सर्वांची मने जिंकावी लागतील. घरोघरी जाऊन सगळ्यांना सांगा की मोदीभाई परभणीत आले होते, सर्वांना मी नमस्कार केलाय, माझा हा नमस्कार तुम्ही प्रत्येक घरात पोहोचवा, असेही मोदींनी म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR