19.4 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रपुण्यातील सर्व टेकड्यांवर बसविणार ‘सर्च लाईट’

पुण्यातील सर्व टेकड्यांवर बसविणार ‘सर्च लाईट’

पुणे : प्रतिनिधी
पुणे शहर संस्कृतीचे शहर होते. यामुळे ‘पुणे तिथे काय उणे’ ही म्हण प्रचलित झाली. परंतु गेल्या काही वर्षांपासून पुणे शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला. गेल्या पाच ते सात दिवसांत पुण्यात अत्याचाराच्या चार घटना उघड झाल्या आहेत. पुणे शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. यामुळे पुणे पोलिसांनी आता शहरातील टेकड्यांवर आणि घाटांमध्ये सर्च लाईट बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या टेकड्यांवर सायरनसुद्धा असणार आहेत.

दरम्यान, पुणे शहर माहिती अन् तंत्रज्ञानाची नगरी झाली अन् देशभरातून सॉफ्टवेअर अभियंते पुण्यात आले. परंतु मागील काही गुन्हेगारीच्या घटना पाहून हळूहळू पुणे शहराची संस्कृती हरवत चालली आहे की काय? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. पुण्यातील सर्व टेकड्यांवर ‘सर्च लाईट’ बसवण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे.

३ ऑक्टोबर रोजी बोपदेव घाटात एका २१ वर्षीय युवतीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केला होता. त्या प्रकरणामुळे पुणे हादरले आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना अजून पकडण्यात पुणे पोलिसांना यश आले नाही. या प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी घाट आणि टेकड्यांवर सर्च लाईट बसवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. तसेच शहरातील सर्व टेकड्यांवर सायरन सुद्धा बसवले जाणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत हा सायरन महत्त्वाचा ठरणार आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत
पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी पोलिसांना उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. निर्जनस्थळी पोलिस चौकी अद्ययावत करावी, सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, गस्त वाढवावी, तसेच वेळोवेळी सायरनचा वापर करावा, असे आदेश डॉक्टर गो-हे यांनी दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR