परभणी : हवामान विभागाकडून ३ दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या इशाºया नुसार परभणी शहरात काल सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास रिमझीम पावसाने हजेरी लावली होती. त्या पाठोपाठ आज मंगळवार, दि.३ डिसेंबर रोजी पावसाने सायंकाळच्या सुमारास रिमझीम स्वरूपात हजेरी लावली. सध्या कापूस तसेच सोयाबिन काढणी झालेली आहे. तर काही ठिकाणी कापूस वेचणी व सोयाबिन काढणी शिल्लक आहे. अचानक हजेरी लावत असलेल्या पावसामुळे शेतकºयांमध्ये मात्र चिंता व्यक्त केली जात आहे.
शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने परभणी जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वाºयाचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर राहून हलक्या स्वरूपाची शक्यता वर्तविण्यात आली होती. यानुसार शहरात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास रिमझीम पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील रस्त्यावर चिखल होण्यासह सखल भागात पाणी साचले होते. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण राहत असल्याने दिवसभर सुर्यप्रकाश राहत नसल्याने सर्वत्र अंधार पसरत आहे.
सध्या कापूस व सोयाबिन वेचणीचे काम पूर्णत्वाकडे असताना पाऊस हजेरी लावत असल्याने या दोन्ही पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असून शेतकºयांमध्ये काळजीचे वातावरण पसरले आहे. शहरात गेल्या २४ तासात ०.९ मि.मि. पाऊस झाल्याची नोंद वनामकृविच्या हवामान विभागात करण्यात आली आहे. पावसामुळे हवेत गारठा वाढला असून किमान तापमान १२.९ तर कमाल तापमान २२.४ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. दिवसेंदिवस तापमानात घट होत असल्याने नागरीकांना हूडहुडी भरताना दिसून येत आहे.