ढाका : बांगलादेशात स्वतंत्र व निष्पक्ष निवडणुका घेण्यास अंतरिम सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन शनिवारी देशातील सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी केले. सर्वसमावेशक आणि बहुलवाद लोकशाहीची स्थापना सुनिश्चित करण्यासोबतच सर्वसमावेशक निवडणुका घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन युनूस यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला दिले. व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर परिषदेत ते बोलत होते.
बांगला देशने ५ ऑगस्ट रोजी दुसरी क्रांती पाहिल्याचे नमूद करत त्यांनी राजकीय उलथापालथी व पंतप्रधान शेख हसीनांनी दिलेल्या राजीनाम्याचा उल्लेख केला. या क्रांतीचे नेतृत्व आमच्या धाडसी विद्यार्थ्यांनी केले व जनतादेखील यात सहभागी झाली. माझ्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले सरकार सर्वसमावेशक व बहुलवाद लोकशाहीत परिवर्तन घडविण्यासाठी आणि स्वतंत्र, निष्पक्ष व सर्वांच्या सहभागातून निवडणुका घेण्यासाठी कटिबद्ध आहे. १९५२ मधील बंगाली भाषा आंदोलनाचा उल्लेख करत या आंदोलनातही बांगला देशी विद्यार्थ्यांनी मातृभाषेसाठी प्राणांची आहुती दिल्याचे युनूस यांनी स्पष्ट केले.