पुरी : वृत्तसंस्था
ओडिशाच्या पुरिस्थित जगन्नाथ मंदिराचे रत्न भांडार ४६ वर्षांनंतर उघडण्यात आले. याचदरम्यान, मंदिराच्या रत्न भांडाराच्या आतील भागात एक गुप्त बोगदा असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे गुप्ता बोगदा खरेच आहे का? हे तपासण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू शकते, असे पुरीचे राजा आणि गजपती महाराज दिव्या सिंह देव यांनी म्हटले आहे.
रत्नभांडाराच्या आतील चेंबरमध्ये बोगदा किंवा गुप्त खोली असण्याची शक्यता असलेल्या प्रश्नांना उत्तर देताना देव यांनी याबाबत माहिती दिली.
अनेक स्थानिकांचा आणि भाविकांना रत्न भांडाराच्या आतल्या खोलीत एक गुप्त बोगदा आहे, असा विश्वास आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण गुप्ता बोगदा आहे की नाही हे तपासण्यासाठी ‘लेझर स्कॅन’ सारखी प्रगत उपकरणे वापरू शकते. अशा तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वेक्षण केल्याने बोगद्यासारख्या कोणत्याही गोष्टीची माहिती मिळू शकते, असे ते म्हणाले.
समितीचे सदस्य आणि सेवादार दुर्गा दासमहापात्रा म्हणाले की, आम्हाला रत्न भंडारात कोणताही बोगदा किंवा गुप्त खोली आढळली नाही. रत्न भांडार अंदाजे २० फूट उंच आणि १४ फूट लांब आहे.