नवी दिल्ली : संसद भवनाच्या सुरक्षेची जबाबदारी आता सीआयएसएफकडे देण्यात आली आहे. यापूर्वी दिल्ली पोलीस ही जबाबदारी पार पाडत होते. केंद्रीय गृह मंत्रालयाने यासंबंधीचे निर्देश दिले आहेत. १३ डिसेंबर रोजी संसदेच्या सुरक्षेत झालेल्या उल्लंघनानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी सीआयएसएफला देण्याचा निर्णय चौकशी समितीच्या शिफारशीनंतर घेण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संसदेच्या सुरक्षेबाबत विरोधी पक्षही केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत सभागृहात येऊन वक्तव्य करावे, अशी विरोधी पक्षांची मागणी आहे.
सीआयएसएफ सुरक्षेची जबाबदारी घेण्यापूर्वी संसद भवन परिसराचे सर्वेक्षणही करणार आहे. गृह मंत्रालयाने सीआयएसएफला संसद भवन परिसराचे सर्वेक्षण करण्यास सांगितले आहे. तसेच संसदेच्या सुरक्षेचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे पोलिसांसमोर झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ललित झा हा सुरक्षा भंगाचा मुख्य सूत्रधार होता. त्याने आपल्या सर्व सहकार्यांसह संसदेच्या आत आणि बाहेर गदारोळ करून सर्वांचे लक्ष वेधण्याची योजना आखली होती.