नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती अहलावत लग्नाच्या २० वर्षानंतर विभक्त होणार असल्याच्या चर्चा आहेत. वीरेंद्र सेहवाग आणि आरती अहलावत २००४ मध्ये विवाहबद्ध झाले होते. रिपोर्ट्सनुसार, दोघांनीही एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे आणि अनेक महिन्यांपासून ते वेगळे राहत आहेत. दोघांचा लवकरच घटस्फोट होण्याची शक्यता आहे.
वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती अहलावत २० वर्षांच्या लग्नानंतर वेगळे होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील जवळच्या व्यक्तीच्या माहितीनुसार, दोघेही अनेक महिन्यांपासून वेगळे राहत असून त्यांच्या घटस्फोट होण्याची शक्यता आहे. सेहवाग आणि आरती यांना आर्यवीर आणि वेदांत अशी दोन मुले आहेत. आर्यवीरचा जन्म २००७ मध्ये झाला, तर वेदांतचा जन्म २०१० मध्ये झाला. या अहवालात दावा करण्यात आला आहे की, अलीकडील अनेक घडामोडी या दोघांमधील वाढत्या अंतराचे संकेत देत आहेत.
रिपोर्ट्सनुसार, सेहवागने दिवाळीच्या दिवशी सोशल मीडियावर आपल्या मुलांचे आणि आपल्या आईसोबतचे फोटो शेअर केले होते. परंतु आरतीचा कोणताही उल्लेख किंवा फोटो शेअर केला नव्हता. यानंतर त्यांच्या विभक्त होण्याच्या चर्चांना आणखी उधाण आले. सेहवागने दोन आठवड्यांपूर्वी पलक्कड येथील विश्व नागयाक्षी मंदिराला भेट दिली होती आणि या भेटीचे फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते. मात्र, पोस्टमध्ये आरतीचा उल्लेख नव्हता. चाहत्यांनी याचा संबंध त्यांच्या नात्यातील वाढत्या तणावाशी जोडला. मात्र, या प्रकरणी सेहवाग किंवा पत्नी आरतीने कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.