मुंबई : हरियाणामध्ये भाजपने शिकवलेला हा धडा राज्यातील मित्रांसाठी संदेश आहे. शिंदे गट आणि अजित पवार गटाला उद्देशून असे खोचक ट्वीट राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी केले आहे. ‘स्वाभिमान गहाण टाकला की गुलामी पत्करावीच लागते’ असेही त्यांनी ट्वीटमध्ये नमूद केले आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी हरियाणामध्ये मोठी घडामोड घडली आणि मोठा राजकीय भूकंप झाला आहे. हरियाणामध्ये भाजपचे सरकार आहे. पण राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. भाजपा आणि जननायक जनता पार्टी (खखढ) यांची आघाडी तुटली. आगामी लोकसभा निवडणुकीत जागावाटपाच्या मुद्यावरून ही आघाडी तुटल्याची चर्चा सुरू आहे. याच मुद्यावरून रोहित पवार यांनी सूचक ट्वीट करत अजित पवार गट आणि शिंदे गटाला सुनावले.
हरियाणामध्ये दोन जागांचा आग्रह करणा-या ‘मित्राला’ भाजपने शिकवलेला धडा हा महाराष्ट्रातल्या मित्रांसाठी संदेश तर आहेच शिवाय अल्टिमेटम देखील आहे. हरियाणातील राजकीय घडामोड बघता विकासाच्या आणि विचारधारेच्या नावाखाली भाजपसोबत जाणा-या महाराष्ट्रातील मित्रपक्षांच्या नेत्यांना ‘स्वाभिमान गहाण टाकला की गुलामी पत्करावीच लागते’ याचा प्रत्यय आलाच असेल.