वर्धा : दारूबंदी जिल्हा अशी वर्ध्याची ओळख असली तरी दारू विक्रीसाठी वेगवेगळी शक्कल लढविली जात असते. कधी देवघराच्या ड्रॉवरमध्ये दारू लपवली जाते तर कधी जॅकेटमधून ती लपवून विकली जाते. अशा अनेक घटना या पूर्वी पोलिसांनी उघडकीस आणल्या आहेत. पण आता चक्क दुचाकीवर दुधाच्या कॅनमध्ये विदेशी दारूच्या बाटल्यांची तस्करीची घटना समोर आली आहे. त्यामुळे आता दुचाकीवरून येणारा दूध विक्रेता की दारू विक्रेता असा सवाल उपस्थित झाला आहे.
वर्ध्यात स्थानिक गुन्हे शाखेची देवळी परिसरात अवैध धंदे बंद करण्यासाठी पेट्रोलिंग सुरू होती. तेव्हा मिळालेल्या माहितीवरून वर्धा ते कळंब मार्गावर सापळा रचला गेला. नजर ठेवून असताना पोलिसाना दुचाकी गाडीवर प्रशांत कोंबे हा व्यक्ती दुधाचे कॅन घेऊन दिसला. दुचाकीवरून दोन्ही बाजूला दूध संकलन करण्यास उपयोगात येणारे कॅन अटकवून तो चालल्याचे दिसून आले.
पोलिसांनी त्याला अडवून त्याची झडती घेतली. त्यानंतर पोलिसांच्या निदर्शनास जे आलं ते चकीत करणारं होतं. कॅनमध्ये विदेशी दारूचा साठा आढळून आला. दारू तस्करी करणाऱ्या आरोपीसह बार मालकवरही गुन्हा दाखल केला असून मुद्देमाल जप्त केला आहे.
देवघरात ठेवली दारू
दारू विकण्यासाठी नवनवीन शक्कल लढवत दारू विक्रेत्यांकडून वर्ध्यात दारू विकली जात असल्याचे अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र, दारू विक्रेत्यांनी आता देवालाही सोडले नसल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. दोन महिन्यांपूर्वी अशीच एक घटना उघडकीस आली. वर्ध्याच्या गणेश नगर येथील एका दारू विक्रेत्याने चक्क देवघरातच दारूची साठवणूक करून तेथून दारू विक्री चालवल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला.