मुंबई : आज असंख्य सिनेमांची रेलचेल असल्याचे पाहायला मिळते. परंतु, या सिनेमांच्या गर्दीत असे काही चित्रपट आहेत, जे वर्षानुवर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. प्रेक्षक आजही तितक्याच आवडीने हे सिनेमा पाहतात. यात मुख्यत्वेकरुन संजय दत्त याचा मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याचा थ्री इडियट्स सिनेमांना आजही प्रेक्षक भरभरुन प्रेम देतात. आता यातच या सिनेमांच्या सिक्वेलबद्दल अपडेट समोर आले आहे.
अशातच आता विधू विनोद चोप्राने थ्री इडियट्स आणि मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटांच्या सिक्वेलबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. विधू विनोद चोप्रा म्हणाले, सध्या फक्त थ्री इडियट्स आणि लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटांच्या सिक्वेलवर काम करत आहे आणि लवकरच चाहत्यांना एक अद्भुत सरप्राईज मिळेल. याशिवाय मी एका हॉरर कॉमेडीमध्येही काम करत आहे. मी अद्याप चित्रपटाचे शीर्षक निश्चित केलेले नाही.
विधू विनोद चोप्रा पुढे म्हणाले, मला आशा आहे की थ्री इडियट्स आणि लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटांचे सीक्वेल लवकरच प्रदर्शित होतील. मला वाटले असते तर मी इतक्या वर्षांत या चित्रपटांचे अनेक सिक्वेल बनवू शकलो असतो. पण, असे केल्याने मला खूप फायदा झाला असता. मी स्वत:साठी एक मोठे घर आणि कार खरेदी करू शकलो असतो. पण तो चित्रपट चांगला निघाला नसता तर मी काय केले असते. प्रेक्षकांना उत्तर देणे माझ्यासाठी कठीण झाले असते. पैसे कमावण्यासाठी मी अशी तडजोड करू शकत नाही. विधू विनोद चोप्राच्या या वक्तव्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई आणि थ्री इडियट्स या सिनेमांची लोकप्रियता आजही यत्किंचितही कमी झालेली नाही. जेव्हा हे चित्रपट प्रदर्शित झाले होते, तेव्हा त्यांनी बॉक्स ऑफिसवर पैसे छापण्यास सुरुवात केली होती. जर आता या सिनेमांचे सिक्वेल आले तर ते बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडतील, यात शंका नाही.