25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र पेटविण्यामागे शरद पवार!

महाराष्ट्र पेटविण्यामागे शरद पवार!

छगन भुजबळांचा बारामतीतूनच आरोप पाठीमागून काहीतरी सल्ले देत आहेत

पुणे : राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून आरक्षणाच्या प्रश्नी मार्ग काढायचे सोडून शरद पवार हे विरोधी पक्षांना काहीतरी सल्ले देऊन महाराष्ट्र पेटवण्याचे काम करत आहेत असा थेट आरोप राज्याचे मंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी रविवार दि. १४ जुलै रोजी येथे केला.

तुमचा राग अजित पवार आणि छगन भुजबळांवर असेल, मग राज्यातल्या ओबीसी समाजाने तुमचं काय घोडं मारलंय असा सवालही भुजबळांनी शरद पवारांना विचारला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा बारामतीमध्ये मेळावा होता. त्यामध्ये छगन भुजबळ बोलत होते. शरद पवारांमुळे विरोधकांनी आरक्षणाच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याचा आरोप करत भुजबळ म्हणाले की, राज्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती. त्यावेळी शरद पवारांना घेऊन यावं अशी विनंती जितेंद्र आव्हाडांना केली होती. व्ही पी सिंहांनी जे ओबीसी आरक्षण दिले त्याची अंमलबजावणी शरद पवारांनी केलं याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. आता आरक्षणाच्या बाबतीत जे काही प्रश्न निर्माण होतात त्यावेळी ज्येष्ठ नेते म्हणून पवारांनी त्या बैठकीला येणं अपेक्षित होते. पण बारामतीतून कुणाचातरी फोन आला आणि विरोधकांनी बहिष्कार टाकला.

ओबीसीने तुमचे काय घोडे मारले?
तुमचा राग हा अजित पवार आणि छगन भुजबळांवर असेल, पण मग ओबीसी समाजाने तुमचं काय घोडं मारलंय असा सवाल छगन भुजबळांनी शरद पवारांना विचारला. ते म्हणाले की, बारामतीमध्ये माळी, मराठा, धनगर समाजाने तुम्हाला मतं दिली. पण सगळ्यांच्या बाबतीत तुमची भूमिका काय हे का सांगत नाही.

पवार मुद्दामहून शांत
विरोधकांना पाठीमागून काहीतरी सल्ले द्यायचे आणि महाराष्ट्र पेटवायचा असा उद्योग सुरू असल्याचा थेट आरोप छगन भुजबळांनी शरद पवारांवर केला. ज्यावेळी निवडणूक येईल त्यावेळी तुमची भूमिका मांडा, आम्ही आमची मांडू. पण राज्यातील सामाजिक प्रश्न पेटत असताना तुम्ही मुद्दामहून शांत का बसताय असेही छगन भुजबळ म्हणाले.

सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावं
राज्यातल्या सामाजिक प्रश्नांवर सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावं आणि चर्चा करून हा प्रश्न सोडवावा असंही छगन भुजबळ म्हणाले. भुजबळ यांनी आपल्या भाषणातून मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करताना शरद पवार यांच्यावरती जोरदार टीका केली. भाषण पूर्ण होताच उपस्थितातून ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा देण्यात आल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR