मुंबई : आमदार रोहित पवार यांची उद्या ईडी चौकशी होणार आहे. त्यामुळे रोहित पवारांच्या समर्थनार्थ पक्ष शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. रोहित पवारांची चौकशी संपेपर्यंत शरद पवार दिवसभर पक्षाच्या कार्यालयातच थांबणार आहेत. तर खासदार सुप्रिया सुळे रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडायला जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यालयाच्या जवळच ईडीचे कार्यालय आहे. उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ईडी कार्यालयाच्या विरोधात जोरदार निषेध आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. बारामती अॅग्रो प्रकरणी ही चौकशी होणार आहे. १९ जानेवारी रोजी रोहित पवारांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले. तसेच २४ जानेवारी रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रोहित पवार या चौकशीला हजर राहणार आहेत.
आजोबा नातवाच्या मागे ठामपणे उभे
मागील अनेक दिवसांपासून रोहित पवारांच्या घरी ईडीची छापेमारी सुरू होती. पण त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले नव्हते. तसेच मी ज्याप्रकारे वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य करतोय, त्यामुळे माझ्यावर केंद्रीय यंत्रणांचा दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे रोहित पवारांकडून वारंवार सांगण्यात येत होते. मात्र या वेळी आलेल्या नोटिसीनंतर रोहित पवारांनी चौकशीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे रोहित पवारांच्या मागे ठामपणे उभे आहेत.