नागपूर : आमदार अपात्रता संदर्भात सुनावणी पूर्ण झाल्याने आता निर्णयाची सर्वांना प्रतीक्षा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील १६ आमदारांवर अपात्रतेची तलवार लटकत आहे. दरम्यान, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी एक मोठा दावा केला आहे. शिवसेना शिंदे गट हा भाजपमध्ये विलीन होणार असून हे १०० टक्के खरे असल्याचे ते म्हणाले आहेत. यामुळे आता भाजपची खरी चाल एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनाही कळेल, असेही ते म्हणाले आहेत.
भाजपला स्वबळावर सरकार आणण्यासाठी विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढवायच्या आहेत. आता लोकसभेत त्यांना किती जागा मिळतील, हे कळेलच, असेही वडेट्टीवार म्हणाले. तसेच ते म्हणाले की, दिल्लीत हायकमांडसोबत बैठक आहे. सगळ्याचे ऐकून घेतले जाईल आणि आम्ही आमची बाजू मांडू. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी आहेच. इतर कुणाला सोबत घ्यायचे यासंदर्भात चर्चा करू. किती जागा हव्या त्याबद्दल मी बोलणार नाही, महाविकास आघाडीच्या बैठकीत जे ठरेल त्यानुसार अंमल करण्यात येईल, असे ते म्हणाले.
नागपुरात काँग्रेसची महारॅली नाही तर सूक्ष्म रॅली होती, राहुल गांधींचं भाषण न ऐकताच लोक निघून जात होते, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांनी काँग्रेसच्या सभेवर निशाणा साधला होता. त्यांच्या या टीकेला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपहासात्मक टोला लगावत उत्तर दिले. देवेंद्र फडणवीसांचा चष्मा जवळचा आहे, त्यामुळे त्यांना राहुल गांधींच्या सभेत दूरवर असलेली गर्दी दिसली नसेल, असे वडेट्टीवार म्हणाले. दोन दिवसांपूर्वी वडेट्टीवार यांनी राज्यात १० जानेवारीनंतर मुख्यमंत्री बदलणार असल्याचेही भाकित केले होते.