छत्रपती संभाजीनगर : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. याभेटीमुळे शिंदे गट आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात असा मोठा दावा शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, फेब्रुवारीत हे दोन नेते एकत्र येऊ शकतात.
संजय शिरसाट म्हणाले की, राजकीय भेट ही जाहीरपणे घेतली जात नाही. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आल्यास हा राजकरणातील मोठा बॉम्बस्फोट असेल. सध्याच्या घडीला ते एकत्र येण्याची कोणतीची चिन्ह नाही. राज ठाकरे सोबत आले तर काही गैर नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जानेवारीच्या शेवटच्या आणि फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही बैठका झाल्या तर त्यामध्ये काही निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या काही चर्चा नाही, असे ते म्हणाले.
सोबत आले तर आनंद
निवडणुकीत प्रत्येकाची आवश्यकता प्रत्येकला भासते. त्यामुळे राज ठाकरे सोबत आले तर आनंद आहे.
त्याचबरोबर भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर आम्ही धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणार आहोत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.