मुंबई (प्रतिनिधी) : चौदाव्या विधानसभेची मुदत संपल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. शिंदे यांनी आज राजभवनवर जाऊन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारून नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करीत असल्याचे पत्र त्यांना सुपुर्द केले.
राज्यात पंधराव्या विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबराला मतदान होऊन २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात आले. निकाल घोषित झाल्यानंतर दुस-या दिवशी म्हणजे २४ नोव्हेंबरला निवडणूक आयोगाकडून निकालाची अधिसूचना आणि निवडून आलेल्या २८८ सदस्यांच्या नावाची यादी राज्यपालांना सादर करण्यात आली. ही प्रक्रिया पार पडल्याने राज्यात चौदावी विधानसभा जाऊन आता पंधरावी विधानसभा अस्तित्वात आली आहे.
या पार्श्वभूमीवर चौदाव्या विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरला संपत असल्याने एकनाथ शिंदे यांनी आज आपला राजीनामा दिला आहे. आता नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईपर्यंत शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. दरम्यान, या वेळी देवेंद्र फडणवीस, अजित पवार, दीपक केसरकर, दादाजी भुसे आणि चंद्रकांत रघुवंशी आदी उपस्थित होते.