अहिल्यानगर : जिल्ह्याचे भाजप मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या राहाता तालुक्यात शिवसेना उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात आमने-सामने आल्याने चांगलाच तणाव निर्माण झाला होता.
नीलम गो-हे आणि संजय राऊत यांच्याविरुद्ध दोन्ही गटांकडून आंदोलन करण्यात आल्याने हा तणाव निर्माण झाला होता. राहाता पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत निवेदन स्वीकारल्याने पुढचा मोठा अनर्थ टळला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या राहाता तालुक्यातील पदाधिका-यांनी संजय राऊत यांच्याविरोधात आंदोलन पुकारले होते. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांनी दिल्लीतील साहित्य संमेलनात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील पद वाटपावर गंभीर आरोप केले होते. त्यावर संजय राऊत यांनी झोंबणारी प्रतिक्रिया दिली होती.
त्याच्या निषेधासाठी शिंदे यांच्या शिवसेनेतील कार्यकर्ते आज एकत्र आले होते. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात आंदोलन होत असून त्यांच्या प्रतिमेला चपलेचा हार घालणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या पदाधिका-यांना मिळाली होती. शिंदेसेनेचे पदाधिकारी करत असलेल्या आंदोलनस्थळी ठाकरेंच्या शिवसैनिकांनी धाव घेतली. ठाकरे आणि शिंदेसेनेचे पदाधिकारी आमने-सामने आल्याने आंदोलनस्थळी चांगलाच गोंधळ उडाला.