22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमुख्य बातम्याराजपथावर अवतरणार ‘शिवशाही’

राजपथावर अवतरणार ‘शिवशाही’

नवी दिल्ली : प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर होणा-या पथ संचलनासाठी महाराष्ट्राच्या वतीने ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान – छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर होत आहे.

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या पथ संचलनात ३० चित्ररथ असणार आहेत. यामध्ये १६ राज्यांचे, सात केंद्रशासित प्रदेशांचे आणि उर्वरित विविध केंद्रीय मंत्रालयांचे चित्ररथ असतील. यंदा राज्याच्या चित्ररथावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणापासून ते स्वराज्य निर्मितीपर्यंतचे प्रसंग दर्शविण्यात आले आहेत.

राष्ट्रीय रंगशाला परिसरात शुभ अ‍ॅड, नागपूर या संस्थेमार्फत चित्ररथाची बांधणी करण्यात येत आहे. तर भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट या कला पथकामधील १६ कलाकारांच्या चमुच्या माध्यमातून चित्ररथाच्या सोबतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. ‘धन्य शिवराय, धन्य महाराष्ट्र!’ या गीताची धून राजपथावर या चित्ररथासह सादर होणार आहे.

चित्ररथात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणापासून ते राज्याभिषेकापर्यंतचा जीवनपट दाखवण्यात येणार आहे. दर्शनी भागात दोन महिला योद्धा दांडपट्टा चालविताना तर राजमाता जिजाऊसाहेब या छत्रपती शिवाजी महाराजांना राजकारण, समानता, न्याय आणि समन्वयाचे धडे देताना दिसतील. त्यांच्या मागे न्यायाचे प्रतीक असलेला तराजू दर्शवण्यात आला आहे.

महाराजांची काही राजचिन्हेही चित्ररथावर आहेत. मध्यभागी अष्टप्रधान मंडळ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार आहे. या दरबारात काही महिला त्यांचे प्रश्न मांडत असल्याचे तर मागील भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, राजमाता जिजाऊसाहेब आणि इतर दरबारी यांच्या दृश्यांसह छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक प्रसंग पहायला मिळणार आहे. शेवटच्या भागात किल्ला आणि राजमुद्रेची प्रतिकृती दाखवण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR