31 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeमहाराष्ट्रअजित पवार गटाला धक्का; भायखळा तालुकाध्यक्षांचा हल्ल्यात मृत्यू

अजित पवार गटाला धक्का; भायखळा तालुकाध्यक्षांचा हल्ल्यात मृत्यू

मुंबई : मुंबईतील भायखळा येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी कुर्मी यांना मृत घोषित केले. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र, या हत्येमागे कोण आहे? याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.

भायखळामधील म्हाडा कॉलनीच्या मागील परिसरात सचिन कुर्मी यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास सदर घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा सचिन कुर्मी जखमी अवस्थेत होते. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ सचिन कुर्मी यांना जे. जे. रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी कुर्मी यांना मृत घोषित केले.

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भायखळा तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांच्यावर झालेला हल्ला हा राजकीय की वैयक्तिक कारणावरून झाला याविषयीची माहिती अद्याप समजू शकली नाही. सचिन कुर्मी यांच्या समर्थकांकडून तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तर पोलिसांनी सदर प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR