छ. संभाजीनगर : ‘भारतात मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन घेतले जाते. एवढ्या प्रमाणात कांदा उत्पादित झाल्याने फक्त ३ लाख टन कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उर्वरित कांदा सहकार मंत्री अमित शाह आणि त्यांच्या सहकारी मंत्री यांच्या घरात पाठवायचा का?’ असा सवाल राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला.
दरम्यान, देशात सर्वात जास्त महाराष्ट्रात साधारण एक लाख हेक्टरवर २५ ते ३० लाख टन कांदा उत्पादित होतो. त्यामुळे फक्त ०३ लाख टनांची निर्यात बंदी उठवून केंद्र सरकारने निव्वळ व्यापा-यांना फायदा पोहचवला असून, शेतक-यांच्या फायद्यासाठी कांदा निर्यातीवरील बंदी सरसकट उठवा अशी मागणी दानवे यांनी केली आहे.
आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, ‘महाराष्ट्रात साधारण एक लाख हेक्टरवर २५ ते ३० लाख टन कांदा कांद्याचे उत्पादन निघते. यातील साधारण १३ लाख टन कांदा देशांतर्गत वापरला जातो. मग उरलेल्या १२ ते १७ लाख टन कांद्यापैकी फक्त ३ लाख टनांची निर्यात करणे हे कोणत्या न्यायात बसते? उरणारा कांदा काय केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांच्या घरी पाठवायचा का?, शेतक-यांची कांदा विक्री अटोपत आलेली आहे. असे असताना निर्यातीचा निर्णय निव्वळ व्यापा-यांच्या फायद्याचा ठरणार आहे, शेतक-यांच्या फायद्याचा नाही. बंदी सरसकटच उठवायला हवी, अशी अंबादास दानवे यांनी मागणी केली आहे.