पुणे : प्रतिनिधी
मंगलमय आणि उत्साही वातावरणात, श्री गणरायाच्या जयघोषात तसेच ढोल ताशांच्या गजरात श्री गणेशाचे आगमन झाले आहे. मुख्य म्हणजे वरुणराजाने विश्रांती घेतली असल्याने कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्साह द्विगुणित झाला होता.
शहर परिसरात सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुका काढून श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. गेल्या दोन तीन दिवस बाजारपेठा खरेदीसाठी फुलल्या आहेत. सकाळी घरा घरामध्ये श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली त्यानंतर सार्वजानिक गणेश मंडळे आणि विविध गृहरचना सोसायट्यामध्ये श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. विविध वयोगटातील व्यक्तींचा उत्साह ओसंडून वहात होता.घरगुती सजावट आणि मंडळाची देखावा सजावट पूर्ण करण्यात कार्यकर्ते गुंतले आहेत.
पुण्याच्या गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जवळपास साडेपाच हजार पोलीस कार्यरत असणार आहेत. त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.तसेच भाविकांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात मेट्रो सेवा मध्यरात्री पर्यंत सुरु ठेवली जाणार आहे. तसेच फूल बाजारात विविध फुलांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे वाढत्या मागणीमुळे फुलांचे दर तेजीत आहेत.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी हिमाचल प्रदेशातील जटोली शिवमंदिर प्रतिकृती उभारण्यात आली आहे. तर कर्नाटकातील श्री दत्त संप्रदायाचे श्री ज्ञानराज महाराज माणिकप्रभू यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तसेच अखिल मंडई मंडळाच्या वतीने रथातून मिरवणूक काढण्यात आली.