नागपूर : नागपुरातून अपघाताची एक भीषण घटना समोर आली आहे. नागपुरच्या बिडगाव परिसरात भरधाव टिप्परने बहीण भावाला धडक दिल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला. बहिण भावाच्या मृत्यूमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास नागपूरमधील बिडगाव परिसरात कचरा घेऊन टिप्परने बहिण भावाला चिरडल्याची घटना घडली. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा भीषण अपघात घडली आहे. या अपघातात दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. सुमित सैनी (१८) अंजली (१६) अशी अपघातात मृत पावलेल्या भाऊ बहिणीचे नाव आहे. अंजली ही एका कॅफेत काम करत होती तर भाऊ सुमित हा गॅरेजमध्ये काम करत होता. भीषण अपघातात बहिण- भाऊ दोघांचाही मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.