सोलापूर – प्रामाणिकपणा व आर्थिक शिस्तीच्या बळावर सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेची आजवरची वाटचाल झाली आहे. ऑडिटमध्ये सातत्याने ‘अ’ दर्जा मिळविणे ही सोपी गोष्ट नाही. मात्र ही किमया करून दाखवत पचास वर्षाचा टप्पा पार करणारी सिद्धेश्वर बैंक म्हणजे सहकारी वित्तपुरवठा क्षेत्रातील रोल मॉडल आहे, असे गौरवोद्वार महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री ना. बाबासाहेब पाटील यांनी काढले.
सिद्धेश्वर बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ हेरिटेज लॉन येथे पार पडला. त्याप्रसंगी उदघाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रिझर्व बँकेच्या केंद्रीय मंडळाचे संचालक सतीश मराठे होते. यावेळी व्यासपीठावर आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे, बँकेचे मार्गदर्शक राजशेखर शिवदारे, अध्यक्ष नरेंद्र गंभिरे, उपाध्यक्षा सुचेता धोबडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सिद्धेश्वर बँकेसारख्या संस्थांनी सोलापूरचे नाव सहकाराच्या क्षेत्रात अग्रभागी आणले. रिझर्व बँकेच्या नियमांचे काटेकोर पालन करत सिद्धेश्वर बँकेने स्वतःची मोठी पत निर्माण केली. महाराष्ट्राने एक ट्रिलियन अर्थकारण करण्याचे जे उद्दिष्ट बाळगले आहे, त्यामध्ये सिद्धेश्वर बँकेप्रमाणे पारदर्शक कारभार करणाऱ्या सहकारी संस्था व बँकांचा सिंहाचा वाटा असणार आहेअशा शब्दांत सहकारमंत्री पाटील यांनी सिद्धेश्वर बँकचे कौतुक केले. सिद्धेश्वर बँकेसारख्या सहकारी वित्तीय संस्था या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला सुलभ अर्थपुरवठा करतात. त्यामुळे सावकाराच्या जाचाच्या दुश्चक्रात न अडकता त्यांना आपली प्रगती साधता येते, असे सतीश मराठे म्हणाले, वसूली प्रक्रिया सुलभ करण्यासाठी शासनाने सहकारी बँकांना सहकार्य करावेअसे आवाहनही त्यांनी राज्य शासनाला केले
ठेवीदारसभासद, कर्जदार अशा सर्वच घटकांच्या अपेक्षा वाहत असल्याने सहकारी वित्तीय संस्था चालविणे म्हणजे सध्या तारेवरची कसरत ठरत आहे. मात्र व्यापारी व तरुणांना अर्थपुरवठा करून सोलापूर जिल्ह्यातील ब्रेन ड्रेनही रोखणे गरजेचे आहे. हे आव्हान पेलण्यासाठी सहकारी वित्तपुरवठा संस्थांनी सिद्धेश्वर बँकेप्रमाणे आदर्श कारभार करावा, असे आवाहन व्यासपीठावर उपस्थित लोकप्रतिनिधींनी केले. सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात या सर्व मान्यवरांच्या हस्ते बँकेच्या पचास वर्षांतील वाटचालीचा मागोवा घेणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तत्पूर्वी बँकेचे मार्गदर्शक राजशेखर शिवदारे यांनी आपल्या स्वागतपर प्रास्ताविकात बँकेच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीचा लेखाजोखा मांडला. ‘सुवर्णनिधी ठेव’ योजनेअंतर्गत बँकेकडे केवळ तीन महिन्यात ७५ कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या. बँकेच्या सभासद व ग्राहकांनी दाखविलेला विश्वास यातून व्यक्त होतो. त्यांच्याबदल कृतज्ञता म्हणून दहा हजार सभासदांना चांदीची सिद्धेश्वर प्रतिमा भेट देण्यात आली. पन्नास वर्षांचा प्रवास हा आव्हानांचा होता. मात्र आजपासून आमची शतकमहोत्सवाकडे धैर्यपूर्वक वाटचाल सुरु झाली आहे, असे बँकेचे अध्यक्ष नरेंद्र गंभिरे यांनी प्रास्ताविकात सांगितले.
आजोबा विष्णुपंततात्या कोठे यांचे निधन झाल्यानंतर मी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलो होतो. मात्र २०२१ साली सिद्धेश्वर बँकेने केलेल्या कर्जपुरवठ्यामुळेच मी सावरू शकलो, अशा शब्दांत आ. देवेंद्र कोठे यांनी बँकेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. शोभा बोल्ली यांनी सूत्रसंचालन केले तर सी.ए. श्रीधर रिसबूड यांनी संचालक मंडळाच्या वतीने आभार मानले. या समारंभास जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक कुंदन भोळे, संतोष पवार, आनंद चंदनशिवे, जुबेर बागवान, अरविंद जोशी, माजी चेअरमन सुभाष
मुनाळे, मल्लिनाथ विभुते, लातूर डि.सी.सी. चे संचालक अशोक गोविंदपूरकर, उद्द्योजक बिपिनभाई पटेल, ज्येष्ठ विधीज्ञ मिलिंद थोबडे, विष्णू मोंंढे, दिपक पाटील, महावीर बँकेचे दिपक मुनोत, अण्णासाहेब कोतली, डॉ. सिद्धेश्वर वाले, भिमाशंकर पटणे तसेच बँकेचे संचालक मंडळातील सर्वश्री सौ. रुपाली बिराजदार, प्रकाश वाले, तुकाराम काळे, अशोक लांबतुरे, पशुपतीनाथ माशाळ, रूपाली बिराजदार, शिवानंद कोनापुरे, बाळासाहेब आडके, भीमाशंकर म्हेत्रे, प्रकाश हत्ती, सिद्धेश्वर मुनाळे, महेश सिंदगी, ऍड. चिवरी, संजय पोळ, राजेश कलशेट्टी व कर्मचारी वर्ग यांच्यासह लातूर, उदगीर, बार्शी, वैराग, मंद्रूप, अक्कलकोट, दुधनी व पुणे येथील सभासद, ग्राहक, स्थानिक व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोबाईल बँकिंग सेवेचा शुभारंभ बँकेने २०१५ ला कोअर बँकिंग प्रणाली स्वीकारली होती. तसेच ऑनलाईन एनपीए कार्यप्रणाली सुरू करणारी सिद्धेश्वर बँक ही सोलापूरातील पहिली बैंक ठरली होती. आता ग्राहकांची गरज ओळखून बँकेने मोबाईल बैंकिंग सेवाही सुरू केली. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते रिमोटद्वारे मोबाईल बैंकिंग सेवेचा शुभारंभ झाला.सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त बँकेला केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री ना. अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, सहकारी बँकांची असोसिएशन असणाऱ्या अम्ब्रेला ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष ज्योतींद्रभाई मेहता यांनी पाठविलेल्या शुभसंदेशांचे वाचन बँकेचे सरव्यवस्थापक राम शर्मा यांनी केले.