24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रअजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मूक आंदोलन, महायुतीत अस्वस्थता

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मूक आंदोलन, महायुतीत अस्वस्थता

दादांना तिस-या आघाडीत पाठवण्याचा दिल्लीचा डाव - रोहित पवार

मुंबई (प्रतिनिधी) : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. विरोधकांनी सरकारविरुद्ध रान पेटवले आहे त्यामुळे सरकारची कोंडी झालेली असताना सत्तेत असणा-या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही आज वेगळी भूमिका घेत राज्यभर मूक आंदोलन करून या घटनेचा निषेध केल्याने महायुतीत अस्वस्थता पसरली आहे. अजित पवार व सेना-भाजपाच्या स्थानिक नेत्यांमध्ये वारंवार खटके उडत असताना या आंदोलनामुळे अजितदादांच्या मनसुब्यांबाबत कुजबूज वाढली आहे. दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांना तिस-या आघाडीत पाठवण्याची दिल्लीची योजना असल्याचा दावा करून आणखी गोंधळ उडवून दिला आहे.

लाडकी बहीण योजनेद्वारे लोकसभेचे प्रतिकूल राजकीय वातावरण बदलण्याचे प्रयत्न सुरू असताना बदलापूर येथील शाळेत चिमुकल्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली. विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सरकारची कोंडी झाली होती. त्यातच मालवणच्या पुतळा दुर्घटनेने सरकार आणखी अडचणीत आले आहे. विरोधकांनी सरकार विरोधात जोडे मारो आंदोलनाची हाक दिलीय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत सारवासारव करत असताना अजित पवार यांनी चूक झाल्याचे मान्य करत घटनेबद्दल महाराष्ट्राची माफी मागितली. एवढ्यावर न थांबता या घटनेचा निषेध करण्यासाठी आज राज्यभरात आंदोलन केले. ‘राजे आम्हाला माफ करा..! राजे तुम्ही ३५० वर्षांपूर्वी बांधलेले किल्ले शाबूत आहेत; पण आताचे पुतळे! निष्क्रिय शासकीय यंत्रणांचा धिक्कार असो!’ या आशयाचे मजकूर असलेले फलक घेऊन कार्यकर्ते मूक आंदोलनात सहभागी झाले होते.

सत्तेत सहभागी असलेल्या अजित पवार यांच्या पक्षाने सरकार विरोधात केलेल्या या आंदोलनामुळे महायुतीत गोंधळ उडाला आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या शासकीय कार्यक्रमात शिंदे-फडणवीसांचे फोटो, नामोल्लेख टाळल्याने आधीच भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतले आहेत. दुसरीकडे रा. स्व. संघाच्या मुखपत्रातून अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे लोकसभेला फटका बसल्याचा दावा वारंवार केला जातोय. यामुळे महायुतीत तणाव असताना आजच्या आंदोलनामुळे आणखी संभ्रम वाढला आहे. दादांचे नेमकं चाललय काय? अशी कुजबूज सुरू झाली.

दादांची वाटचाल तिस-या आघाडीकडे
आजच्या आंदोलनामुळे राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू झालेली असताना राष्ट्रवादीच्या पवार गटाचे आमदार आणि पवार घराण्यातील नवे शिलेदार रोहित पवार यांनी अजित पवार यांची तिस-या आघाडीकडे वाटचाल सुरू असल्याचा दावा करून गोंधळ उडवून दिलाय. महिलांवरील वाढते अत्याचार, प्रत्येक कामात दलाली खाण्याची सरकारची प्रवृत्ती यामुळे राज्यभरात संतापाची लाट निर्माण झाली असून याचा भाजपाने प्रचंड धसका घेतला आहे.

या रोषाचा फटका बसू नये म्हणून मत विभाजन करण्यासाठी सरकारमधील एका गटाला तिसरी आघाडी स्थापन करण्याचे दिल्लीवरून आदेश आले आहेत. या आदेशाला मूर्त रुप देण्यासाठी एक गट सरकारविरोधात आंदोलन करत असल्याची चर्चा आहे, असा दावा रोहित पवार यांनी केलाय. त्याच वेळी आंदोलन केल्याने त्या गटाला तिसरी आघाडी स्थापन करायचा मार्ग मोकळा होईल; परंतु दलाली खाण्याच्या ज्या पापाचे भागीदार आहात त्या पापातून मुक्ती मात्र कदापि मिळणार नाही हे मात्र लक्षात असू द्या…! असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलंय.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR