23.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रप्रेयसीला मारहाण प्रकरणी एसआयटी स्थापन

प्रेयसीला मारहाण प्रकरणी एसआयटी स्थापन

चौफेर टीकेनंतर ठाणे पोलिस आयुक्तांचा निर्णय

ठाणे : प्रेयसीला मारहाण प्रकरणात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचे पुत्र अश्वजित गायकवाड यांच्यासह तीन जणांवर अद्याप अटकेची कारवाई झालेली नसून त्याचबरोबर या गुन्ह्यात भादंवि कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न करणे)चा समावेश नसल्यामुळे पोलिसांवर चौफेर टीका होऊ लागली आहे. या टीकेनंतर ठाणे पोलिस आयुक्त जयजीत सिंग यांनी या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून त्यामार्फत तपास सुरू केला आहे. या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाने घेतली असून आयोगाने ठाण्याचे जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांकडून तातडीने अहवाल मागवला आहे.

घोडबंदर येथील वाघबीळ भागात २६ वर्षीय पीडित तरुणी राहते. अश्वजित गायकवाड याच्यासोबत गेल्या साडेचार वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचा दावा पीडितेने केला आहे. ११ डिसेंबर रोजी पहाटे ४.३० वाजता अश्वजित याने घोडबंदर येथील एका हॉटेलजवळ भेटण्यास बोलावले. तिथे झालेल्या वादानंतर त्याने मारहाण करत कारने धडक देऊन गंभीर जखमी केल्याचा आरोप पीडितेने केला होता. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे कासारवडवली पोलिसांनी अश्वजितसह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गुन्ह्यात दुखापत करणे, बेदरकारपणे वाहन चालविणे, इतरांच्या जीवितास किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणा-या कृतीने जबर दुखापत पोचवणे, धमकावणे अशी कलमे लावण्यात आली आहेत. या गुन्ह्यात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
तसेच या प्रकरणात ३०७ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी पीडित तरुणीने केली असून पीडित तरुणीच्या वकील दर्शना पवार यांनी पत्रकारांशी बोलताना अशीच मागणी करत याप्रकरणी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. पोलिसांनी अद्याप ही मागणी मान्य केलेली नाही.

या प्रकरणात एक बडा उद्योगपती हस्तक्षेप करीत असून या प्रकरणात पोलिसांवर दबाव असल्याची चर्चा शहरात आहे. या प्रकरणामुळे ठाणे पोलिस टीकेचे धनी ठरू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिस आयुक्त जयजीत सिंग यांनी या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या आधिपत्याखाली विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले आहे.

‘‘कासारवडवली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात एक महिला तक्रारदार असून त्यात आरोपींमध्ये अश्वजित गायकवाड आणि इतरांचे नाव आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या आधिपत्याखाली विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले आहे. हे पथक सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करीत आहे. साक्षीदारांचे जबाब नोंदविले जात आहेत. फॉरेन्सिक पुरावे गोळा केले जात आहेत. तपासादरम्यान आणखी तथ्ये उघड झाल्यास कायद्याच्या पुढील कलमांचा समावेश केला जाईल’’, असे ठाणे पोलिस आयुक्त जयजीत सिंग यांनी म्हटले आहे.

ठाणे जिल्ह्यात तरुणाने आपल्या मित्रांच्या मदतीने त्याच्या प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना प्रसार माध्यमातून समोर आली आहे. पीडित तरुणी जखमी असून मानसिक तणावाखाली आहे. या वृत्ताची राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून ठाण्याचे जिल्हा दंडाधिकारी आणि पोलिस आयुक्त यांच्याकडून तातडीने अहवाल मागवला आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी समाजमाध्यमांद्वारे दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR