नवी दिल्ली : आयुष्यभर ज्यांनी कष्टकरी व कामगारांसाठी, शेतक-यांसाठी स्वत:ला झिजवले, त्या सिताराम येचुरींच्या कुटुंबीयांना मोठा निर्णय घेतला आहे. ज्या रुग्णालयात त्यांचे निधन झाले, त्या दिल्लीतील एम्स रुग्णालयास सिताराम येचुरी यांचे पार्थिव देण्यात येणार आहे. देहदान करण्याचा निर्णय येचुरी यांच्या कुटुंबीयाने घेतल्याची माहिती एम्स रुग्णालयाने दिली आहे.
कामगार कष्टक-यांचा आवाज बनून ज्यांनी आपले आयुष्य सर्वसामान्यांसाठी झिजवले. चळवळीपासून सुरू केलेला राजकीय प्रवास शेवटपर्यंत कामगार, कष्टकरी आणि मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षासोबत एकनिष्ठ राहिला. अखेर आज वयाच्या ७२ व्या वर्षी ज्येष्ठे नेते आणि माकपचे सरचिटणीस सिताराम येचुरी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर देशभरातून दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, राहुल गांधी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी दु:ख व्यक्त करत त्यांच्या आठवणी जागवल्या आहेत.
ज्येष्ठ कम्युनिष्ट नेते सिताराम येच्युरी यांचा मूळचा जन्म मद्रासमधील. आयुष्यभर त्यांनी कम्युनिष्ट पक्षाचं काम जोमाने केले विशेष म्हणजे भारतात कम्युनिष्ट पक्षाच्या वाढीचा आणि पक्षाला उतरती कळा लागण्याचा काळही येच्युरी यांनी पाहिलेला आहे. सध्याच्या केरळमधील सरकारमध्येही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. सिताराम येच्युरी यांच्या जाण्याने कम्युनिष्ट पक्षाने बुद्धीवादी चेहरा आणि कामगार, शेतक-यांचा हक्काचा आवाज गमावला आहे. सीताराम येच्युरी यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. सिताराम येच्युरींनी कॉलेज जीवनापासून राजकारणात सहभाग नोंदवत होते.
आणिबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. तेव्हापासूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या दोन्ही सरकारमध्ये ते सत्तेत सहभागी झाले होते. सिताराम येच्युरी यांना १९ ऑगस्ट रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ते लाईफ सपोर्ट सिस्टमवर होते. मागील काही दिवसांत त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत होती. मात्र, त्यानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. एम्स रुग्णालयातील डॉक्टरांची टीम सातत्याने त्यांच्यावर लक्ष ठेऊन होती. मात्र, अखेरीस आज त्यांची शेवटचा श्वास घेतलाय.
आयुष्यभर कष्टकरी आणि शेतक-यांसाठी लढलेल्या या नेत्याने मृत्यूनंतरही समाजासाठी योगदान दिले आहे. कारण, सिताराम येचुरी यांच्या पार्थिवावर अन्त्यसंस्कार होणार नसून त्यांचे देहदान करण्यात आले आहे. त्यामुळे, आयुष्यभर कष्टक-यांसाठी लढले आणि मृत्यूनंतरही समाजाच्या कामी आले, असे नेते म्हणून इतिहास त्यांची नोंद ठेवेल. एम्स रुग्णालयातील विद्यार्थ्यांना संशोधन आणि शिक्षणासाठी त्यांचा देह वापरला जाईल.
जेएनयु उभारण्यात त्यांचे मोठे योगदान : राऊत
सिताराम येचुरी यांच्या निधनाने एक अभ्यासू नेता आपल्यातून हरपला. अगदी छात्र चळवळपासून त्यांनी काम केले आहे. राजधानी दिल्लीत आज जेएनयु जे दिसतय त्यात मोठे काम त्यांचे होते. कोणतीही तडजोड न करता काम करणारा नेता अशी त्यांची ओळख होती. इंडिया आघाडी एकत्रित ठेवण्यासाठी कायम त्यांचा पुढाकार होता. पाच दशकांच्या राजकारणाचा अनुभव असलेला हा नेता. ते कमिन्यूस्ट असले तरी सर्वांशी कायम ऋणानुबंध असलेले नेते होते, उद्धव ठाकरेंनी देखील त्यांना श्रद्धांजली अर्पण केल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले.