21.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeसोलापूरसोलापुरात कोविडचे सहा रुग्ण; पालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क

सोलापुरात कोविडचे सहा रुग्ण; पालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क

सोलापूर – शहरात सहा कोविड बाधित रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी दोघे उपचारानंतर बरे झाले आहेत. उर्वरित चार रुग्णांवर खासगी रुग्णालयात औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या आजाराचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज असून नागरिकांनी घाबरुन न जाता सतर्क राहावे, असे आवाहन महापालिकेच्या प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी केले आहे. नव्याने आढळून आलेल्या कोविड रुग्णांचे नमुने तपासणी करण्यासाठी पुण्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील संबंधित प्रयोगशाळेला पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. तो आल्यानंतरच कोविडचा नवा व्हेरिएंट आपल्या शहरात आला आहे किंवा नाही ते स्पष्ट होईल, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.

सध्या महाराष्ट्रासह देशाच्या काही भागात कोविड जे.एन.१ रुग्णांच्या दैनंदिन संख्येत वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. नववर्ष स्वागत तसेच पुढील महिन्यात भरणाऱ्या गड्डा यात्रेच्या निमित्ताने नागरिकांनी अनावश्यक गर्दी करु नये, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. सर्दी, खोकला यामुळे आजारी असलेल्या व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, सहव्याधीग्रस्त यांनी प्राधान्याने मास्कचा वापर करावा. वारंवार हाताची स्वच्छता राखावी. फ्लू सदृश्य लक्षणे असणारे रुग्ण व श्वसनास त्रास होणाऱ्या रुग्णांनी जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन आपली कोविड चाचणी करुन घ्यावी. तसेच चाचणीचा अहवाल येईपर्यंत स्वतःहून अलगीकरणात राहावे. कोविड पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींनी आपली कोविड चाचणी करुन घ्यावी, असे आवाहनही महापालिकेने केले आहे.

सध्या कोविडबाधित रुग्णांमध्ये आढळून येणारा हा नवा व्हेरिएंट तुलनेने सौम्य प्रकारचा असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महामारी अथवा जीवितहानी संभवत नाही. तरीही काही विपरीत परिस्थिती उद्भवल्यास महापालिकेची रुग्णालये, दवाखाने ही औषधोपचार व मनुष्यबळाने सुसज्ज असून नागरिकांनी घाबरुन न जाता सतर्क राहावे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR