सोलापूर : सोलापूर जिल्हा प्रशासनात सहआयुक्त तथा नगरपालिका म्हणून जबाबदारी प्रशासन अधिकारी हाती घेतल्यापासून वीणा पवार यांनी कामाचा सपाटा लावला आहे. शंभर टक्के निधी खर्च करण्याचे उद्दिष्ट लवकरच पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले आहे. पवार यांनी पेंडिंग कामांच्याही फाइल हाती घेतल्या असून त्यांच्या या कामाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही कौतुक केले. दरम्यान, वीणा पवार यांच्या कार्यालयाकडून २०२२-२३ मध्ये जिल्ह्यातील एक महानगरपालिका आणि १७ नगरपालिकांनाच्या विकास कामांसाठी १६१.८२ कोटींचा निधी वितरित झाला आहे.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी सुधार योजना, अग्निशामक व आणीबाणीच्या सेवांचे बळकटीकरण करणे, नागरी दलितेतर वस्ती सुधारणा योजनांच्या माध्यमातून देण्यात आला आहे. सोलापूर मनपा व जिल्ह्यातील नगरपालिकांना हा निधी वितरित झाल्याने विविध विकासकामांना चालना मिळाली आहे. आमच्या विविध योजनांसाठी शासनाकडून हा आलेला निधी आम्ही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली १०० टक्के वापरणार असून, सर्व निधीचा विनियोग करणार असल्याचाही निर्वाळा वीणा पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिला.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (जिल्हा स्तर) योजनेद्वारे सोलापूर महापालिका, बार्शी, पंढरपूर, अक्कलकोट, करमाळा, कुडुवाडी, सांगोला, मंगळवेढा, दुधनी, मैंदर्गी, मोहोळ, माढा, माळशिरस, महाळुंग श्रीपूर, वैराग, नातेपुते, अनगर, अकलूज आदी नगरपालिकांची मागणी ९७.२१ कोटींची होती. तर नगरपालिकांचा हिस्सा १७.६६ कोटीचा होता. त्यांना जिल्हा नियोजन कार्यालयाकडून ७९. ५६ कोटीचा निधी वितरित झाला आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेद्वारे एक महापालिका आणि १७ नगरपालिकांची ६४.६६ कोटीची मागणी होती. त्यांना जिल्हा नियोजन कार्यालयाकडून (डीपीडीसी) ६३.४५ कोटीचा निधी वितरित झाला आहे. अग्निशामक व आणीबाणी सेवांचे बळकटीकरण योजनेद्वारे वरील सर्वांसाठी तीन कोटीचा निधी वितरित झाला तर नागरी दलितेतर वस्ती सुधारणा योजनेद्वारे आजतागायत सोलापूर मनपा वगळून १५.८१ कोटीचा निधी वितरित करण्यात आला आहे.