जयपूर : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरोधात राजस्थान रॉयल्सने शनिवारी चौथा विजय मिळवला. संजू सॅमसनच्या संघाने आयपीएलच्या १७ व्या हंगामात आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. १९ व्या सामन्यात आरसीबीने २० षटकांत ३ गडी गमावून १८३ धावा केल्या. तर प्रत्युत्तरात राजस्थानने पाच चेंडू आणि सहा गडी राखून सामना जिंकला. या सामन्यात सौरव चौहान या युवा खेळाडूने आरसीबीसाठी पदार्पण केले. पहिल्याच सामन्यात तो विशेष कामगिरी करू शकला नाही, तरीदेखील त्याच्या १५० च्या स्ट्राईक रेटने सर्वांनाच प्रभावित केले.
शनिवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात सौरव चौहानने आरसीबीकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. पहिल्या सामन्यात त्याने राजस्थानविरुद्ध सहा चेंडूंचा सामना केला आणि नऊ धावा केल्या. या छोट्या डावात सौरवने एक षटकारही ठोकला. सौरवच्या पदार्पणाबद्दल संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस म्हणाला की, बरेच लोक सौरवला ओळखत नाहीत.
त्याच्याकडे फलंदाजीत खूप कौशल्य आणि ताकद आहे, तो एक चांगला आणि शांत खेळाडू आहे असे डू प्लेसिस म्हणाला. सौरवचा जन्म २७ मे २००० रोजी अहमदाबादमध्ये झाला. वयाच्या २१ व्या वर्षी त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. सौरवचे वडील दिलीप चौहान ग्राऊंड्समन (क्रिकेट मैदानाची देखरेख ) करण्याचे काम करतात. सौरवने त्याच्या कारकीर्दीत आतापर्यंत सहा प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २२५ धावा केल्या आहेत.
सौरवच्या नावावर आहे विशेष विक्रम
सौरव हा तोच फलंदाज आहे ज्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खळबळ उडवून दिली होती. त्याने आंध्र प्रदेशविरुद्ध १३ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. अभिषेक शर्माने हा विक्रम मोडला होता. पंजाबच्या या फलंदाजाने १२ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. आरसीबीने २३ वर्षीय फलंदाजाला लिलावादरम्यान २० लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सौरवच्या नावावर स्ट्राईक रेटचा विशेष विक्रम आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये १० पेक्षा जास्त चेंडू खेळल्यानंतर त्याचा स्ट्राईक रेट ३३८.८८ होता.