हेग : इस्रायल गाझामध्ये ‘नरसंहाराच्या कृत्यांमध्ये’ गुंतलेला असल्याचा आरोप करत दक्षिण आफ्रिकेने आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) धाव घेतली असून इस्राईलविरुद्ध खटला दाखल केला आहे. आयसीजेने ‘जेनोसाईड कन्व्हेन्शन’ अंतर्गत इस्रायलच्या दायित्वांच्या कथित उल्लंघनाशी संबंधित गुन्हा दाखल केल्याची पुष्टी केली आहे. दक्षिण आफ्रिकेने शुक्रवारी आयसीजेला तातडीच्या आदेशाची मागणी केली आहे की, इस्रायलने गाझामधील पॅलेस्टिनी गट हमासच्या विरोधात केलेल्या कारवाईत १९४८ नरसंहार कराराच्या अंतर्गत त्याच्या दायित्वांचे उल्लंघन केले आहे.
आयसीजेमध्ये अपील दाखल केल्यानंतर, दक्षिण आफ्रिकेने एका निवेदनात म्हटले आहे की त्यांचा देश नरसंहार होण्यापासून रोखण्यासाठी बांधील आहे. निवेदनानुसार, गाझा पट्टीवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यामुळे आणि तेथील रहिवाशांना जबरदस्तीने काढून टाकल्यामुळे दक्षिण आफ्रिका नागरिकांच्या दुरवस्थेमुळे चिंतेत आहे. याशिवाय, मानवतेविरुद्धचे गुन्हे आणि युद्ध गुन्ह्यांसारख्या आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांचे तसेच नरसंहार किंवा तत्सम गुन्ह्यांचे अहवाल सतत समोर येत आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. दक्षिण आफ्रिकेने आपल्या अर्जात आयसीजेला पुढील आठवड्यात सुनावणी घेण्यास सांगितले आहे.
हेग, नेदरलँड्स येथे स्थित आयसीजे ही संयुक्त राष्ट्रांची प्रमुख कायदेशीर संस्था आहे. हे वेगवेगळ्या देशांमधील विवादांचे निराकरण करते आणि आंतरराष्ट्रीय कायदेशीर समस्यांवर सल्ला देते. मात्र, इस्रायलने हा आरोप ‘निराधार’ असल्याचे सांगत आरोप फेटाळून लावला आहे. दक्षिण आफ्रिकेने केलेला हा आरोप इस्रायल फेटाळतो, असे इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिओर हयात यांनी दक्षिण आफ्रिकेचा दावा ‘न्यायालयाचा घृणास्पद आणि अवमानजनक शोषण’ असल्याचे म्हटले आहे.