दुबई : साउथ सुपरस्टार अभिनेता अजित कुमार हा सध्या दुबई शर्यतीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रशिक्षण घेत आहे. यादरम्यान मंगळवारी त्यांच्या गाडीला झालेल्या भीषण अपघाताचा व्हीडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे, ज्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
या व्हायरल होत असलेल्या व्हीडीओ क्लीपमध्ये कार रस्त्याच्या बाजूला सुरक्षेसाठी उभारलेल्या कठड्याला धडकताना दिसत आहे. या धडकेनंतर गाडी जागेवर काही काळ फिरत राहते आणि अखेर थोड्यावेळाने थांबते. सुदैवाने अजित कुमार याला या अपघातात कुठलीही दुखापत झाली नाही आणि तो अपघात झालेल्या गाडीपासून दूर जाताना दिसत आहे. या अपघातात अभिनेत्याला कोणतीही दुखापत झालेली नाही, मात्र इकडे त्याच्या चाहत्यांनी त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यास सुरूवात केली आहे.
अभिनेता अजित कुमार पहिल्यांदाच स्पोर्ट रेसिंगमध्ये सहभागी झालेला नाही. लहान वयापासून अजित याला रेसिंगची आवड आहे. इतकेच नाही तर त्याने २००० च्या दशकात रेसिंग करियरवर लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी आपल्या अभिनयापासून ब्रेक देखील घेतला होता. दरम्यान आता तब्बल एका दशकाहून अधिक काळानंतर तो अजित कुमार रेसिंग नावाच्या त्याच्या नव्याने तयार केलेल्या संघाच्या माध्यमातून तो रेसिंग सर्किटवर परतला आहे.