सोलापूर : रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा व इतर पिकांच्या पेरणीचा कालावधी जवळपास संपला आहे. मका आणखीन पेरणी होऊ शकते. यंदा उशिरापर्यंत पाऊस पडल्याने ज्वारीचा पेरा कमी झाला आहे. पाऊस चांगला पडल्याने सगळीकडे पाणी असल्याने रब्बी हंगामातील पिकांना पाणी पुरेसे आहे. ज्वारी आणि सोलापूर जिल्हा असे रब्बी हंगामाचे सूत्र ठरलेल्या जिल्ह्यात यंदा सरासरीच्या ७६ टक्के क्षेत्रावर ज्वारी पेरणी थांबली आहे.
गहू, हरभ-याच्या क्षेत्रात मात्र वाढ झाली आहे. जिल्ह्यात एकूण ९१ टक्के क्षेत्रावर रब्बीच्या विविध पिकांची पेरणी झाली आहे असे जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी सांगीतले. राज्यातील लातूर, अहिल्यानगर, सोलापूर व अन्य काही जिल्ह्यात ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. सोलापूर जिल्हा तर ज्वारी उत्पादनात अग्रेसर जिल्हा अशी ओळख आहे; मात्र मागील काही वर्षांत ज्वारीची जागा अन्य पिकांनी घेतली आहे. बाजारातील परिस्थितीनुसार शेतक-यांनीही पीक पद्धतीत बदल केल्याचे दिसत आहे. त्यामुळेच जिल्ह्यात वरचेवर ज्वारीचे क्षेत्र कमी-कमी होताना दिसत आहे.
यंदा जिल्ह्याचे ज्वारी पेरणी सरासरी क्षेत्र तीन लाख १८ हजार हेक्टर इतके आहे. प्रत्यक्षात दोन लाख ४२ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेर झाली आहे. सरासरीच्या ७६ टक्के इतकीच ज्वारी पेरणी झाली आहे.गहू, हरभरा व मका पेरणी क्षेत्रात सरासरीपेक्षा वाढ झाली आहे. गहू ५० हजार हेक्टरपेक्षा अधिक, हरभरा ६६ हजार तर मका ६० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरा झाला आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात ६६ हजार हेक्टर क्षेत्रावर नव्याने ऊस लागवड झाली आहे. त्यामध्ये पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक साडेतेरा हजार हेक्टर, माळशिरस तालुक्यात साडेनऊ हजार हेक्टर, मोहोळ तालुक्यात आठ हजार हेक्टर, करमाळा तालुक्यात ६ हजार हेक्टर, अक्कलकोट तालुक्यात ५ हजार ५५६ हेक्टर, दक्षिण तालुक्यात पाच हजार ४०० हेक्टर, माढ्यात पाच हजार २०० हेक्टर, उत्तर सोलापूर तालुक्यात पाच हजार हेक्टर, सांगोल्यात ३३०० हेक्टर, मंगळवेढा तालुक्यात ३१०० हेक्टर तर बार्शी तालुक्यात सतराशे हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड झाली आहे.
सांगोला तालुक्यात सरासरीच्या २८७ टक्के, उत्तर तालुक्यात ८६ टक्के, बार्शी तालुक्यात ६६ टक्के तर सरासरीच्या ४९ टक्के क्षेत्रावर ऊस लागवड झाली आहे. दररोजच्या आहारात आवश्यक असलेले करडई आता दुर्लक्षित पीक झाले आहे. जिल्ह्यात १२३० हेक्टर क्षेत्रावर करडईचा पेरा झाला आहे. त्यामध्ये एकट्या मंगळवेढा तालुक्यात १०७२ हेक्टर क्षेत्रावर करडई पीक घेतले आहे. इतर तालुक्यात फार कमी क्षेत्रावर करडईची पेरणी झाली असली तरी माळशिरस, करमाळा, पंढरपूर व मोहोळ तालुक्यात पेरणी शून्यावर आहे.