मुंबई : प्रतिनिधी
सोयाबीन आणि कापसाचे दर घसरलेले असल्याने शेतक-यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे याची धास्ती महायुती सरकारने घेतली आहे. त्यामुळे सोयाबीन आणि कापसाची हमीभावाने खरेदी कशी होईल, यासाठी तातडीने हालचाली सुरू केल्या असून, त्यासाठी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्याशी चर्चा करून खरेदी केंद्रे वाढविण्याची विनंती केली. त्यामुळे गोयल यांनी खरेदी केंद्र वाढीला हिरवा कंदील दाखविल्याचे समजते. यावरून शेतमालाची राज्य सरकारने कशी धास्ती घेतली, याचा अंदाज येतो.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय कृषी आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाशी चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाली आहे. राज्यात कापूस आणि सोयाबीनच्या हमीभावाने खरेदीसाठी अधिकाधिक केंद्रे वाढविण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासमवेत चर्चा झाली. यासंदर्भात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सकारात्मकता दर्शविली आहे.
केंद्र सरकारने आधीच या अगोदर सोयाबीन आणि कापसाच्या हमीभावात वाढ केली आहे. मध्यम धागा कापसाला प्रति क्विंटल ७,१२१ रुपये हमीभाव निश्चित करण्यात आला तर लांब धागा कापसाला ७,५२१ रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला.
हा हमीभाव गेल्या वर्षाच्या तुलनेत ५०१ रुपये प्रतिकिं्वंटलने वाढला आहे. यासोबतच सोयाबीनचा दर ४ हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटल दर झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ही वाढ झालेली आहे. गेल्या वर्षी सोयाबीनचा दर ४ हजार ६०० रुपये होता. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतक-यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळणार असून, त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत होणार आहे.