नवी दिल्ली : भारताच्या प्रतिमेला तडा जाईल अशी एक धक्कादायक घटना घडली आहे. भारत फिरण्यासाठी आलेल्या एका स्पॅनिश महिलेसोबत सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. ८ ते १० आरोपींनी मिळून हे कृत्य केले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. बलात्काराच्या या घटनेनंतर पीडित महिला स्वत: बाईक चालवत उपचारासाठी रुग्णालयात आली. पीडितेला डॉक्टरांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पीडित महिला पतीसोबत झारखंड दुमका येथे गेली होती.
माहितीनुसार, हे प्रकरण हंसडीहा पोलिस ठाणे क्षेत्र कुरुमाहाट येथील आहे. पीडित महिला स्पेनची राहणारी आहे. महिला फिरण्यासाठी म्हणून दुमका येथे आली होती. शुक्रवारी रात्रीची ही घटना आहे. महिलेसोबत तिचा पती सुद्धा होता. ते बाईकवरून भागलपूरला चालले होते. त्यावेळी टेंट लावून ते रस्त्यात थांबले होते.
परदेशातून हे पती-पत्नी टूरिस्ट व्हिजावर भारतात आले होते. हे जोडपे भारतात येण्याआधी पाकिस्तानात गेले होते. पाकिस्तानातून बांगलादेश आणि तिथून झारखंड दुमका येथे पोहोचले होते. दुमका हंसडीहा पोलिस ठाणे क्षेत्र कुंजी गावात तंबू टाकून हे जोडपे थांबले होते.
झारखंडवरून ही स्पॅनिश महिला नेपाळला जाणार होती. महिला तंबूमध्ये असताना आठ ते दहा लोक तिथे आले. त्यांनी महिलेवर सामूहिक अत्याचार केला. पीडित महिला पतीसोबत बाईकवरून दुमका येथील हॉस्पिटलमध्ये पोहोचली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एसपी पितांबर सिंह खेरवार घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. परदेशी महिलेसोबत झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा मुद्दा झारखंडच्या सभागृहात उपस्थित करण्यात आला आहे. ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचे भाजपाने म्हटले आहे.