29.4 C
Latur
Saturday, April 13, 2024
Homeराष्ट्रीयतेलंगणमध्ये बीआरएसला घरघर, निवडणुकीच्या तोंडावर खिंडार

तेलंगणमध्ये बीआरएसला घरघर, निवडणुकीच्या तोंडावर खिंडार

नवी दिल्ली : तेलंगणमध्ये काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीचा (बीआरएस) पुरता पराभव केला होता. या पराभवाच्या धक्क्यातून ‘बीआरएस’ अद्यापही सावरू शकलेली नाही. एकीकडे, चंद्रशेखर राव आजारी आहेत तर दुसरीकडे त्यांच्या कन्या के. कविता या उत्पादन शुल्क गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगात गेल्याने पक्षाला घरघर लागल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांचे ९ पैकी ४ खासदार इतर पक्षांत गेले आहेत.

गतवर्षीच्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने ‘बीआरएस’चा पराभव करीत विधानसभेवर झेंडा फडकावला होता. तेव्हापासून सुरु असलेली ‘बीआरएस’ची वाताहत थांबलेली नाही. राज्यात लोकसभेच्या १७ जागा असून त्यातील ११ जागांवर पक्षाने उमेदवार घोषित केले. तिकडे चार विद्यमान खासदारांनी पक्षाला रामराम केला. या खासदारांमध्ये झहीराबादचे बी. बी. पाटील, नागरकुर्नूलचे पी. रामुलू, वारंगळचे पासूनुरी दयाकर आणि चेवेल्ला मतदारसंघाचे डॉ. रंजीत रेड्डी यांचा समावेश आहे.

राष्ट्रीय पातळीवर झेप घेण्याची महत्वाकांक्षा ठेवत चंद्रशेखर राव यांनी तेलंगण राष्ट्र समितीचे नाव बदलत भारत राष्ट्र समिती असे केले होते. मात्र आता स्वत:च्या राज्यातच राव यांना झगडावे लागत आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप यांच्याकडून सरस कामगिरी होण्याच्या शक्यतेने नेते, कार्यकर्ते ‘बीआरएस’मधून बाहेर पडत आहेत. राव आणि के. कविता यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

के. कविता यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ‘ईडी’ने गेल्या शुक्रवारी त्यांना हैदराबाद येथून अटक केली होती. अटकेनंतर कविता यांना दिल्लीत आणले गेले असून न्यायालयाने २३ मार्चपर्यंत कोठडी दिली. आपली अटक बेकायदा असल्याने जामीन दिला जावा, असा युक्तिवाद कविता यांनी जामीन अर्जात केला आहे.

उमेदवारांसाठी शोधाशोध
निजामाबाद हा के. कविता यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. कविता यांना गतवेळी या मतदारसंघात भाजपच्या अरव्ािंद धर्मापुरी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. कविता यांना यावेळी येथून तिकीट दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र पक्षाने माजी आमदार बाजीरेड्डी गोवर्धन यांना संधी दिली. अनेक मतदारसंघांत उमेदवारांसाठी पक्षाला शोधाशोध करावी लागत आहे. तर काही विद्यमान खासदारांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला. लोकसभा निवडणुकी दरम्यान के. कविता तुरुंगातून बाहेर पडू शकल्या नाहीत तर बीआरएसची धुरा एकट्या चंद्रशेखर राव यांच्या खांद्यावर येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR