नवी दिल्ली : शब्द ही मराठी, भाव ही मराठी, सुख ही मराठी, दु:ख ही मराठी, तर घरात नसता कोणी, सभा भरली भांड्यांची, मनात माझ्या कविता, कविता माझी प्रेरणा, असे विविध विषयांची मांडणी कवी कट्टा या आगळ्यावेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून कवींनी केली आणि रसिकांनी टाळ्यांच्या गजरात उस्फूर्त प्रतिसाद दिला.
नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्र्जा मिळाला हाच धागा पकडून कवींनी या विषयावरील कविंतांचे प्रभावीपणे सादरीकरण केले. गेली दहा वर्षे कवी कट्टा उपक्रम सुरु असून या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. यावर्षी सुमारे १५०० काव्य रचना महामंडळाकडे पाठविण्यात आल्या. त्यावर निवड समितीने विचार करून १८० रचनांची निवड केली. संमेलनातील दोन दिवसांतील उपक्रमात एकूण ११ सत्रांत काव्याचे सादरीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे यंदा महाराष्ट्र बरोबर अमेरिका, सुरत, बंगलोर, गोवा, दिल्ली, हैदराबाद येथील कवींनी सहभाग घेतला अशी माहिती उपक्रमाचे प्रमुख आणि ज्येष्ठ कवी राजन लाखे यांनी सांगितली.
विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांच्या हस्ते काव्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाचे संयुक्त सचिव प्राजक्ता लवंगारे उपस्थित होत्या. माय मराठी, निसर्ग तसेच गझल आणि रुसवा, क्षण, माझ्या मना, अवकाळी, रेशीम स्पर्श,नक्षी, पोशिंदा जगाचा,सभा अशा दैनदिन वाटचालीतील विषयांची मांडणी कवीनी केली. यामध्ये वैशाली बोकील, अरुंधती वैद्य, मनीषा गायकवाड, सुरेश शेठ, प्रसन्न खंडाळे, श्रीराम वाघ, दिलीप जाणेर, महादेव खोत आदी कवी सहभागी झाले होते.
आनंदी गोपाळवर परिचर्चा
आनंदी गोपाळ या कादबरीवरील परीचर्चा संमेलनाच्या दुपारच्या सत्रात आयोजित करण्यात आली होती.डॉ राजेंद्र वाटाणे यांनी या विषयावरील परीचर्चेची भूमिका मांडली. डॉ. तेजस चव्हाण यांनी सांगितले की, ही कादबरी संवादात्मक स्तरावरची असून यामुळे चरित्रात्मक कादंबरीची वाटचाल सुकर होऊ शकली आहे. या लेखनातून स्वभावातील चढ उतार मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर डॉ समिता जाधव म्हणाल्या की, लेखकाने दोन व्यक्तिमत्वाची चरित्र सांगितली आहे. तसेच मनातील विचारांची आंदोलने मांडली आहेत. तर डॉ वंदना चव्हाण म्हणाल्या की, या कादंबरीत आनंदी आणि गोपाळ यांच्या विवाहानंतरचा प्रवास उलगडला आहे.विविध भागात केलेल्या कार्याचा तपशील देण्यात आला आहे. संपूर्ण लेखन हे संवादी स्वरुपात करण्यात आले आहे. तर प्राचार्य सुनील पाटील आणि चित्रा वाघ यांनी मनोगत व्यक्त केले.