पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या काही कार्यकर्त्यांनी माझा प्रचारच केला नाही, अशी खदखद महायुतीचे लोकसभेचे उमेदवार आणि विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केली आहे. तसेच आपण इथे २ लाखांहून अधिक मताधिक्याने निवडून येऊन असा दावाही केला.
तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार ठाकरे सेनेचे संजोग वाघिरे यांनी आपण १ लाख ७२ हजार मतांनी निवडून येऊ असा दावा केला आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपल्यासाठी काम केले नाही हे सांगताना बारणे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी स्पष्टपणे सूचना दिल्या होत्या. तसेच ते माझ्या दोन सभांना उपस्थितही होते. राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि आमदारांनीही माझ्यासाठी काम केले. पण राष्ट्रवादीच्या तळातल्या खालच्या कार्यकर्त्यांपैकी काही कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही, असा मोठा दावाही त्यांनी केला.