मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील अनेक भागांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विदर्भ, मराठवाड्यात लोकांना अक्षरक्ष: टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. त्याच बरोबर जनावरांच्या चा-याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे १५ जुलैपर्यंत पुरेल एवढाच चारा सध्या राज्यात शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या ४० तालुक्यांतील पशुधन वाचविण्यासाठी तातडीने चारा डेपो सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. हे चारा डेपो ३१ ऑगस्टपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत.
दुष्काळी भागात तातडीने चारा, पाणी व अन्य सोयीसुविधा उपलब्ध करून जनतेला दिलासा देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनास दिले होते. पशुधनाची संख्या, चारा टंचाईची तीव्रता, पशु संवर्धन विभागाचा अहवाल विचारात घेऊन चारा डेपोसाठी गावे निश्चित केली जाणार आहेत. स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन गावांची संख्या कमी-अधिक करण्याचे अधिकार जिल्हाधिका-यांना दिले आहेत.
या डेपोचे संचालन सहकारी संस्था, कृषी उत्पन्न बाजार समित्या, दूध खरेदी-विक्री संघ, इतर सेवाभावी संस्था, तसेच चारा छावण्या ज्या संस्थांमार्फत चालवल्या जातात, त्यांनाच डेपो चालविण्यास देण्यात येणार आहेत. चा-याचे नुकसान झाल्यास ती रक्कम जिल्हाधिका-यांनी डेपो चालकांकडून वसूल करावी, असे या निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
राज्यात ५१२ टन हिरवा चारा
सध्या राज्यात ५१२.५८ टन हिरवा चारा उपलब्ध असल्याचा अहवाल पशुसंवर्धन विभागाने दिला. पशुधनाचा विचार करता हा चारा १५ जुलैपर्यंत पुरेल, असे विभागाचे म्हणणे आहे. तसेच १४४.४५ टन वाळलेला चारा उपलब्ध असून, तो ३० जूनपर्यंत पुरेल, असे म्हटले आहे. त्यामुळे चारा डेपो सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.