27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeसोलापूरराज्य उत्पादन शुल्क विभागाचे हातभट्ट्यांवर छापे

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे हातभट्ट्यांवर छापे

सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी जिल्हाभरातील हातभट्ट्यांवर धाडी टाकून नऊ गुन्ह्यात दोनशे साठ लिटर हातभट्टी दारू व एकवीस हजार सहाशे पन्नास लिटर गुळमिश्रित रसायनासह साडे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरातील हातभट्टी ठिकाणांवर मंगळवारी धाडी टाकण्यात आल्या. या मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क अ विभाग, ब विभाग, भरारी पथक व सीमा तपासणी नाक्याच्या पथकाने सकाळच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील हातभट्ट्यांवर टाकलेल्या धाडीत 2 आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत निरिक्षक नंदकुमार जाधव यांच्या पथकाने विश्वनाथ फुलचंद पवार, वय 40 वर्षे, रा. वरळेगाव तांडा हा गुरप्पा तांडा येथे हातभट्टी दारु गाळतांना आढळून आल्याने त्याचेविरुद्ध गुन्हा नोंदवला. त्याच्या ताब्यातून 3800 लिटर रसायन जप्त करण्यात आले.

तसेच या पथकाने सिताराम तांड्यावर धाड टाकून 3600 लिटर रसायन जागीच नाश केले. आरोपी पळून गेल्याने त्याचा शोध सुरु आहे. भरारी पथकाचे दुय्यम निरिक्षक शिवकुमार कांबळे यांच्या पथकाने बक्षीहिप्परगा येथे 2600 लिटर रसायन जागीच नाश केले. दुय्यम निरिक्षक सुरेश झगडे यांचे पथकाने गुरप्पा तांडा येथील हातभट्टीवर 3800 लिटर रसायन नाश केले. सिमा तपासणी नाक्याचे दुय्यम निरिक्षक सचिन गुठे यांच्या पथकाने गणपत तांडा व सिताराम तांड्यावरील झुडपात लपवून ठेवलेले प्लास्टीक बॅरलमधील एकुण 6500 लिटर रसायन जप्त करुन जागीच नाश केले. एका अन्य कारवाईत दुय्यम निरिक्षक सुखदेव सिद यांनी त्यांचे पथकासह सोलापूर-हैदराबाद रोडवर पाळत ठेवून विनोद काशीनाथ राठोड, वय 34 वर्षे, रा. मुळेगाव तांडा या इसमास त्याच्या टऌ 13 ऊर 9013 या सुझुकी एक्सेस मोटरसायकलवरुन दोन रबरी ट्यूबमधून 180 लिटर हातभट्टी दारुची वाहतूक करतांना पकडले. त्याच्या ताब्यातून एकोणपन्नास हजार दोनशे किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. निरिक्षक माळशिरस सचिन भवड यांच्या पथकाने माळशिरस तालुक्यातील वेळापूर गावच्या हद्दीतील पारधीवस्ती येथे हातभट्टी ठिकाणावर धाड टाकली असता प्रियंका तानाजी काळे, वय 23 वर्षे ही महिला एका प्लास्टीक कॅनमध्ये 50 लिटर हातभट्टी दारु सह मिळून आल्याने तिच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. या ठिकाणावरुन उसाच्या शेतात लपविलेल्या तिन बॅरेलमध्ये 550 लिटर गुळमिश्रित रसायनही जप्त करुन जागीच नाश करण्यात आले. एका अन्य कारवाईत दुय्यम निरिक्षक करमाळा दत्तात्रय पाटील यांचे पथकाने भाळवणी (ता. करमाळा) येथे विजय दत्तू काळे, वय 34 वर्षे याच्या ताब्यातून 800 लिटर रसायन व 30 लिटर हातभट्टी दारु असा बाविस हजार शंभर किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या संपूर्ण कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने नऊ गुन्हे नोंदविले असून चार आरोपींना अटक केली असून दोनशे साठ लिटर हातभट्टी दारु, एकविस हजार सहाशे पन्नास लिटर रसायन व एक मोटरसायकल असा एकूण पाच लाख अट्ठेचाळीस हजार सहाशे किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त पुणे सागर धोमकर यांच्या आदेशान्वये व अधीक्षक नितिन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संजय पाटील, निरिक्षक जगन्नाथ पाटील, नंदकुमार जाधव, पंकज कुंभार, सचिन भवड, दुय्यम निरिक्षक सुरेश झगडे, शिवकुमार कांबळे, अंजली सरवदे, धनाजी पोवार, सुखदेव सिद, समाधान शेळके, श्रद्धा गडदे, दत्तात्रय पाटील, बाळू नेवसे, सचिन गुठे, सहायक दुय्यम निरिक्षक मुकेश चव्हाण, अलीम शेख, गजानन होळकर, जवान किरण खंदारे, अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट, अशोक माळी, शोएब बेगमपुरे, विकास वडमिले, गजानन जाधव, तानाजी जाधव, प्रशांत इंगोले, अमित गायकवाड, आनंदराव दशवंत, नंदकुमार वेळापूरे, चेतन व्हनगुंटी, वसंत राठोड, योगीराज तोग्गी, वाहनचालक रशिद शेख, दिपक वाघमारे व मारुती जडगे यांनी पार पाडली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR