सोलापूर : जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने करण्यात आलेली पाणी गुणवत्ता तपासणी योग्य की अयोग्य आहे, याची तपासणी करण्यासाठी राज्याचे विशेष पाणी तपासणी पथक सोलापुरात दाखल झाले आहे. त्यांच्याकडून अक्कलकोट, पंढरपूर, करमाळा आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील गावांना भेटी देऊन तपासणी केली जात आहे.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गावात जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाकडून रासायनिक आणि जैविक पध्दतीने पाण्याची तपासणी करण्यात येते. ती तपासणी योग्य आहे की, नाही यांची तपासणी त्रयस्थ संस्थेचे अधिकारी मनिषा हातळगी, एस. सी. मुजावर हे करत आहेत. पाणी गुणवत्ता विषयक अहवाल नोंदवा अद्यावत आहेत का, गावनिहाय निवड केलेल्या पाच महिलांची माहिती ऑनलाईन नोंदणी केलेली आहे का, निवड केलेल्या पाच महिलांचे प्रशिक्षण झाले आहे का, निवड केलेल्या महिला फिल्ड टेस्ट किट, एचटूएस किटचा वापर करतात का, अशा विविध गोष्टींची तपासणी राज्याच्या विशेष तपासणी पथकांकडून करण्यात येत आहे.
जिल्ह्यात पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने जैविक व रासायनिक तपासणी करण्यात आली आहे. ती तपासणी योग्य आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी राज्याचे पाणी तपासणी पथक दाखल झाले आहे. त्याच्यांकडून चार तालुक्यातील बारा गावांना भेटी देऊन तपासणी करण्यात येत आहे असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी सांगीतले.