मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून चर्चा सुरू असून, वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश करण्यात आला आहे. वंचित नेते प्रकाश आंबेडकर स्वत: महाविकास आघाडीच्या एका बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना तुमचा पक्ष महाविकास आघाडीसोबत जाणार का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. याला राज ठाकरे यांनी मोजक्या शब्दांत उत्तर दिले. मीडियाशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. शिर्डी, नगरचे पदाधिकारी येऊन गेले. पुढे ठरवू काय करणार अजून वेळ आहे. सर्व जागा लढवाव्या अशी मागणी पक्षातून होते आहे. कुठे निवडणूक लढवावी याबाबत चाचपणी करत आहोत. सत्ताधारी पक्षही चाचपणी करत आहेत, आम्हीही करतोय, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.
राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत आले तर घेणार का असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला होता. संजय राऊत म्हणाले होते की, प्रकाश आंबेडकर यांनाही निमंत्रण दिले नव्हते तरी ते आले. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आताचे लवंडे कुठे जातील याचा पत्ता नाही. यांच्या महाविकास आघडीकडे कोण जाणार? यांचा काही भरवसा आहे का? कोण जाईल यांच्याकडे? इंडिया आघाडीत नितीश कुमारही होते, कुठे गेले? अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.
दरम्यान, अयोध्येत जाणार आहे, गर्दी कमी झाल्यानंतर जाईन. प्रत्येक निवडणूक वेगळी असते. ठोकताळे मांडता येत नाही. १९९२ ला बाबरी, बॉम्बस्फोट या पार्श्वभूमीवर निवडणूक झाली होती. २०१४ वेगळे कारण होते. आता राम मंदिर झाल्याचे समाधान आहे पण भाजपाला मतदान करतील असे नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.