पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुन्हा वाढत्या लोकसंख्येवर भाष्य केले आहे. एक किंवा दोन अपत्यांवर थांबा. लोकसंख्या वाढली तर ब्रह्मदेवाला सुद्धा सर्वांना घर देणे शक्य होणार नाही, असे अजित पवार म्हणाले. पिंपरीतील कार्यक्रमात त्यांनी मिश्किल वक्तव्य केले आहे.
अजित पवार म्हणाले, बाबांनो तुम्ही दोन किंवा एक अपत्यावर थांबा. तेवढं करा, कारण मी काही वर्षांपूर्वी खासदार झालो तेव्हा लोकसंख्या काय होती अन् आता ३३ वर्षांनी किती झाली. मग ब्रह्मदेव जरी आला तरी सर्वांना घर बांधून देऊ शकत नाही.
सकाळी ९ वाजता कार्यक्रम घेतल्याने काहींची अडचण झाली. परंतु सकाळी सुरुवात केली तर कामे लवकर होतात, असे देखील अजित पवार म्हणाले.
पंतप्रधान आवास योजनेच्या लॉटरीसाठी महानगरपालिकेने कोणताही दलाल नेमला नाही. नाहीतर मार्केटमध्ये फिरत असतात. तुम्हाला कोणी नंबर काढून देतो तर तक्रार करा, अजिबात त्यांना सोडणार नाही, असा इशारा देखील अजित पवार यांनी दिला. नशिबाने तुमचा नंबर लागणार आणि हे शहाणे म्हणतात बघा माझ्यामुळेच तुमचं स्वप्न पूर्ण झालं नंतर पैसे लुबाडतात, असे देखील अजित पवार यांनी सांगितले.