मुंबई : मुंबई महापालिकांच्या शाळांमध्ये ‘प्रभू श्रीराम’ विषयावर निबंध, चित्रकला व कवितालेखन स्पर्धा आयोजित करण्याचे निर्देश पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. धर्माच्या आधारावरील स्पर्धांना समाजवादी पक्षाने विरोध केला असून, पालिका शाळांचे भगवेकरण थांबवावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून केली आहे. मुंबई पालिकेच्या शाळांमध्ये सर्वधर्मीय विद्यार्थी शिक्षण घेतात.
ज्या शिक्षण संस्थेचे प्रशासन राज्य चालवते किंवा राज्य निधीतून सा मिळते, अशा संस्थेत धार्मिक शिक्षण-कार्यक्रम-उपक्रम राबविण्यास भारतीय राज्यघटना मान्यता देत नाही. राज्यघटनेच्या अनुच्छेद २८ (१)नुसार शिक्षणापासून धर्म वेगळा केलेला आहे. राज्य सर्व धर्मांचे समान रक्षण करते, सर्व धर्मांप्रति तटस्थता आणि नि:पक्षपातीपणा राखते. तसेच कोणत्याही एका धर्माला राज्य धर्म मानत नाही, असे भारतीय संविधान सांगते, याकडे ‘सप’चे आमदार रईस शेख यांनी पत्रात लक्ष वेधले आहे. पालकमंत्री लोढा यांना शिक्षण विभागाच्या विषयात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचा दावा त्यांनी पत्रात केला आहे.
‘सूर्यनमस्कार अनिवार्य करण्याचा प्रयत्न’
‘पालिका शाळांमध्ये यापूर्वी ‘सूर्यनमस्कार’, ‘वंदे मातरम्’ अनिवार्य करण्याचा प्रयत्न झाला होता. तेव्हा नगरसेवकांनी सभागृहात चर्चा करून शिक्षणामध्ये धर्म आणू नये, असा निर्णय केला आहे. सद्यस्थितीत पालिकेत नगरसेवक नाहीत. यापूर्वी सर्व नगरसेवकांनी चर्चा करून घेतलेला निर्णय कायम आहे आणि तो आजही ग्रा धरला पाहिजे,’ अशी मागणी शेख यांनी पत्रात केली आहे.