मुंबई : प्रतिनिधी
शुक्रवारी (१५ ऑगस्ट) राजकुमार राव, श्रद्धा कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘स्त्री २’ सिनेमा रिलीज झाला. स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या ‘स्त्री २’ सिनेमाने गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण केली होती.
पहिल्या भागाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर ‘स्त्री २’ सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी जोरदार अॅडव्हान्स बुकिंग केली होती. याचा फायदा सिनेमाला झालेला दिसून आला. पहिल्याच दिवशी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली.
सॅकनिल्कच्या अहवालानुसार ‘स्त्री २’ सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी ५४.३५ कोटींची कमाई केली. पहिल्याच दिवशी ‘स्त्री २’ने बंपर ओपनिंग केली आहे.
इतकेच नव्हे तर या वर्षातील बॉलिवूडमध्ये सर्वाधिक ओपनिंग करणारा सिनेमा म्हणून ‘स्त्री २’ कडे पाहिले जात आहे. याआधी २०२४ च्या जानेवारीत रिलीज झालेला हृतिक रोशनच्या ‘फायटर’ सिनेमाने २४ कोटींची कमाई केली होती. स्वातंत्र्यदिनानिमित्त लागून सुट्या आल्याने ‘स्त्री २’बॉक्स ऑफिसवर आणखी चांगली कमाई करेल यात शंका नाही.
‘स्त्री’, ‘भेडीया’, ‘मुंज्या’ या सिनेमांनंतर ‘स्त्री २’या युनिव्हर्समधील पुढचा सिनेमा आहे. ‘स्त्री २’मध्ये लोकप्रिय कलाकारांची फौज आहे. या सिनेमात राजकुमार राव, अपारशक्ती खुराणा, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी हे कलाकार पुन्हा एकदा धमाल करताना दिसत आहेत. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार या सिनेमात कॅमिओ भूमिका करत असल्याने हा सिनेमा आणखी लोकप्रिय होईल यात शंका नाही. ‘स्त्री २’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर आणखी किती कमाई करतो याचीही सर्वांना उत्सुकता आहे.