नवी दिल्ली : शेवटच्या क्षणी उमेदवार जाहीर करण्याचा आणि उमेदवार बदलण्याचा फटका शिवसेनेला बसला. या गोष्टी झाल्या नसत्या तर आम्ही दोन अंकी संख्या गाठली असती, अशी कबुली शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. झालेल्या चुकांचे विश्लेषण केले जाईल, असेही ते म्हणाले.
मी मंत्री व्हावे अशी सर्वांची इच्छा असली तरी सध्या गरज पक्षबांधणीची असल्याचे सांगत श्रीकांत शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदैव कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले आहे. त्यांनी मला मंत्रिपद न दिल्यामुळे राज्यात योग्य तो संदेश गेला आहे. माझ्यापेक्षा वरिष्ठ नेते पक्षात आहेत. त्यांना पक्षाने संधी दिली.
लोकसभा निवडणुकीत दोन खासदारही निवडून येतील, असे वाटले नव्हते. मात्र जिंकून येण्याचा आमचा सरासरी दर चांगला आहे. काही पक्षातील लोकांनी स्वत:च्या मुलाला पॅराशूट लँडिंग करुन आमदार करून घेतले, त्यानंतर त्याला मंत्रिपद दिले, असा टोला शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता मारला.
मुख्यमंत्र्यांनीच दिला प्रस्ताव : जाधव
शिवसेनेच्या सर्व खासदारांनी मंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव दिला होता. मात्र शिंदे यांनी संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी माझ्या नावाची शिफारस केली असे खा. प्रतापराव जाधव यांनी सांगितले.