मुंबई : राज्यातील ओबीसी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि विज्ञान विषयांसाठी आता शिक्षक मिळणार आहेत. १४१ खाजगी अनुदानित उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी २८२ शिक्षकांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी अधिवेशनात दिलेल्या आश्वासनानुसार पदभरती होणार आहे.
विज्ञान शाखेसाठी वाढीव प्रत्येकी दोन विषय शिक्षकांची पदे मंजूर झाली आहेत. ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी अधिवेशनात आश्वासन दिले होते. कला, वाणिज्य किंवा कला, विज्ञान अशा दोन विद्या शाखा असलेल्या आश्रमशाळांसाठी एकूण आठ शिक्षक मिळणार आहेत.
राज्य शासनाकडून पुरविण्यात येणा-या निधीच्या तुलनेत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, जेवण आणि इतर सोयीसुविधा दिल्या जात असल्याची खात्री करावी. तसेच ज्या निवासी वसतिशाळांमध्ये संस्थाचालकांकडून या सोयीसुविधा पुरविण्यात त्रुटी अथवा कमतरता आढळून येत असल्यास त्याचा अहवाल विभागाकडे सादर करण्याचे आदेश मंत्री सावे यांनी अधिका-यांना दिले.
आश्रमशाळांना दर आठ दिवसाला ठरवून भेटी द्याव्यात, विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्था, विद्यार्थीसंख्या, पटपडताळणी यासह विविध बाबींचा तपासणीदरम्यान आढावा घेण्याचे आदेश सहकार आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत.