जिंतूर : जवाहर प्राथमिक विद्यालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. दादारावजी सितारामजी वटाणे पाटील यांच्या १७व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त सुंदर हस्तकला वस्तू व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते रिबीन कापून सुंदर हस्तकला वस्तूंचे व विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यालयातील १७० विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे आपले प्रयोग दाखवले. सुंदर हस्तकला वस्तू बनवणे यामध्ये ३६० विद्यार्थ्यांनी आपल्या वस्तू बनवून आणल्या होत्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य बळीरामजी वटाणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, केंद्रप्रमुख एम.डी घुगे, कवी साहित्यिक मयूर जोशी, संस्थेचे संचालक किशनरावजी वटाणे, पालक प्रतिनिधी संजय गायके, विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मते उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते कै. दादाराव वटाणे पाटील व विद्येची देवता माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यानंतर मुख्याध्यापक मते यांनी प्रास्ताविकामधून विद्यालयामध्ये घेण्यात येणारे विविध उपक्रम तसेच विविध स्पर्धा परीक्षा विषयी माहिती दिली. यानंतर उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, केंद्रप्रमुख एम.डी घुगे, मयूर जोशी यांनी विद्यार्थ्यांनी आणलेले प्रयोग पाहून समाधान व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात बोलताना प्राचार्य वटाणे यांनी विद्यार्थ्यांनी बालवयापासूनच विज्ञानाची आवड जोपासली पाहिजे व अंधश्रद्धेला थारा न देता आपले जीवन जगले पाहिजे असे प्रतिपादन केले.
सूत्रसंचालन श्रीमती अलका परणे यांनी तर आभार विष्णू रोकडे यांनी मानले. या कार्यक्रमास शाळेतील सहशिक्षक शिवाजी ठोंबरे, रामकिशन टाके, अमोल राऊत, ज्ञानेश्वर पोटे, श्रीमती अनुजा कामारीकर, श्रीमती कविता वैष्णव, रोहिणी बारहाते उपस्थित होते.