बार्शी- शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी म्हणून प्रशासकीय पातळीवर बार्शी तालुक्यातील सोयाबीन पिकाचे पंचनामे करण्यात आले होते. पंचनामे होऊनही बराच काळ गेला. मात्र, अद्याप अनुदानाचा पत्ता नाही.
बार्शी तालुक्यातील सोयाबीन पिकावर यलो मोॉक व खोडकुज या विषाणूजन्य व बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सोयाबीन पिकाचे ७० ते ८० टक्के नुकसान झाले होते. राज्य शासनाने या नुकसानीची दखल घेऊन, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांच्या आदेशानुसार तालुक्यातील सोयाबीन पिकाचे पंचनामे करण्यात आले होते.
संबंधित तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायक यांनी पिकाचे पंचनामे करून दोन महिने झाले, तरी अजूनपर्यंत तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही. शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचे अनुदान दहा दिवसांच्या आत जमा झाले नाही तर बार्शी तालुक्यातील शेतकरी तहसील कार्यालय बार्शी येथे १९ डिसेंबर
रोजी उपोषण करणार आहेत,
असे निवेदन अपर तहसीलदार वृषाली केसकर यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन देताना राहुल भड, अशोक माळी, अमोल भोसले, भास्कर काकडे, चंद्रकांत मुंबरे आदी शेतकरी उपस्थित होते.