परभणी : जिल्ह्यातील बोरी वन क्षेत्रात अस्वस्थ अवस्थेत वनविभागाला एक मादी काळवीट सापडले होते. या काळवीटाला उपचारासाठी पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय परभणी येथे नेण्यात आले. या काळविटाची प्राथमिक तपासणी व सोनोग्राफी केल्यानंतर पशुवैद्यकीय तज्ञांना ती गर्भवती असल्याचे आढळले.
तसेच मासपेशीच्या क्यापचुर मायोप्याथी आजाराने ग्रासित झाल्याने गर्भाशयावर येणा-या तीव्र दबावामुळे काळविटाच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे या काळविटाचे सिझेरीयन करण्यात आले असून काळविट सुखरूप आहे.
पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ञानी सिझेरियन शस्त्रक्रियेच्या मदतीने काळविटाच्या पोटातील बाळाचे सुरक्षितपणे प्रसूती करण्याचे निश्चित केले. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर काळविट सुरक्षित आहे. परंतु गर्भ पिशवीतील पाणी बाळाच्या नाकातून फुप्फुसामध्ये गेल्याने बाळाला वाचवता आले नाही. सध्याच्या स्थितीत काळविटाला विश्रांती देण्यात येत असून लवकरच जंगलात सोडले जाईल.
वन विभागाचे अधिकारी आणि पशुवैद्यकीय तज्ञांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे सर्व शक्य झाले आहे. शस्त्रक्रियेवेळी पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ञ डॉ. वैजनाथ काळे, डॉ. सूर्यकांत कदम, डॉ.क्षितिज कोंडूलकर, डॉ.देवाशिष बावस्कर, संदेश गिरी, ऋषिकेश हरणे, प्रथमेश मिरगेवार, आश्विन पुरम, गौरी डांबारे, वैष्णवी गवशेटवार, संकेत रावडे, सावित्रा शेळके इ. विद्यार्थी व वन विभागातील कर्मचारी राम खटिंग उपस्थित होते. काळविटाचा जीव वाचल्याने सर्वांचे कौतूक होत आहे.